छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेतील वितरण व्यवस्था बळकट व्हावी यासाठी सोमवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी चार अधिकाऱ्यांच्या टास्क फाेर्सची स्थापना केली. प्रत्येक अधिकाऱ्याला कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय. अंतिम टप्प्यातील कामे करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महापालिका, नॅशनल हायवे, ग्रामीण पोलिस, महावितरण, आदी शासकीय कार्यालयांमार्फत अडचणी सोडविण्यात येत आहेत. योजनेच्या पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत तरी पूर्ण व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, वाढीव पाणी मिळाले तरच शहराला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
अधिकाऱ्यांवर स्वतंत्र जबाबदारीशहरात पाण्याची वितरण व्यवस्था भविष्यात चांगली असावी यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व उपअभियंत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या (पाणी उपसा केंद्र) कामासाठी दक्षता विभागाचे प्रमुख एम. बी. काझी यांची नियुक्ती केली. नक्षत्रवाडी येथील एमबीआर (संतुलित जलकुंभ) साठी विशेष कार्य अधिकारी के. एम. फालक यांना जबाबदारी दिली. पाणी योजनेच्या एकूण वितरणाच्या कामासाठी अतिरिक्त शहर अभियंता ए. बी. देशमुख यांची नियुक्ती केली आहे.