गौण खनिजाच्या कारवाईचे उद्दिष्ट २८ टक्क्यांवरच

By Admin | Updated: January 13, 2015 00:13 IST2015-01-12T23:59:05+5:302015-01-13T00:13:10+5:30

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यातील वाळू, खडी, मुरुम, माती याची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार

The target for mineral operations is only 28% | गौण खनिजाच्या कारवाईचे उद्दिष्ट २८ टक्क्यांवरच

गौण खनिजाच्या कारवाईचे उद्दिष्ट २८ टक्क्यांवरच



बाळासाहेब जाधव , लातूर
लातूर जिल्ह्यातील वाळू, खडी, मुरुम, माती याची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या-त्या तालुक्यांतील तहसीलदारांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, या कारवाईत पोलिस प्रशासनाचे म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने गौण खनिजाच्या कारवाईचे उद्दिष्ट नऊ महिन्यांत २८ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर निघत आहे.
लातूर जिल्ह्यात वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची परवानगी घेण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली आहे. त्यानंतर एकाही वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी नवीन परवाना काढलेला नाही. तर माती, दगड, मुरुम वाहतूक करणाऱ्या ९१ वाहनधारकांपैकी ३४ जणांनी परवाने काढले आहेत. उर्वरित वाहनधारक मात्र अवैध पद्धतीने वाळू, दगड, माती, मुरुम याचा उपसा करीत असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. २०१४-१५ या चालू वर्षात लातूर तालुक्याला ३२५ प्रकरणांचे उद्दिष्ट दिले होते. नऊ महिन्यांत लातूर तहसीलदारांनी ५० प्रकरणे मार्गी लावली आहेत. या माध्यमातून केलेल्या कारवाईचे प्रमाण १५ टक्क्यांवरच आहे. औसा तालुक्याला दीडशे प्रकरणांचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ९० कारवाईची प्रकरणे मार्गी लागली आहेत. त्यामुळे या तालुक्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर गेले आहे. रेणापूर तालुक्यासाठी शंभर प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २४ वाहनधारकांवरच कारवाई करून थांबल्याने हे उद्दिष्ट २४ टक्क्यांवर गेले आहे.
उदगीर तालुक्यासाठी २८५ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, या तालुक्याचे प्रमाण ३२ टक्क्यांवर गेले आहे. जळकोट तालुक्यासाठी ९० प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, या तालुक्यांचे प्रमाण २५ टक्क्यांवर गेले आहे. अहमदपूर तालुक्यासाठी २४० प्रकरणांचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ९१ वाहनधारकांवर कारवाई केल्याने या तालुक्याचे प्रमाण ३८ टक्क्यांवर पोहोचले आहे. चाकूर तालुक्यासाठी २३० प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १३२ अवैध वाहनधारकांवर कारवाई केल्याने हे प्रमाण ६० टक्क्यांवर आले आहे. निलंगा ३५५ प्रकरणांपैकी १०९ वाहनधारकांवर कारवाई केल्याने या तालुक्याचे उद्दिष्ट ३३ टक्क्यांवर आले आहे. देवणी तालुक्यासाठी १२५ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या माध्यमातून ३९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, या तालुक्याचे उद्दिष्ट ४८ टक्क्यांवर गेले आहे. शिरूर अनंतपाळ १२० प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे तालुक्याचे उद्दिष्ट १२ टक्क्यांवर गेले आहे. अशा एकूण लातूर जिल्ह्यासाठी २०२० प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ६५९ वाळू, रेती, दगड, मुरुम याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून २८ टक्क्यांवरच उद्दिष्ट पोहोचले असून, या माध्यमातून ५४ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
लातूर जिल्ह्यात चालू महिन्यातही गौण खनिज, अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम रेणापूर, लातूर आणि उदगीर तालुक्यांत सुरू केली आहे. परंतु, या मोहिमेला गती मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाचे म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. गेल्यावर्षी रेणापूर तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, पोलिस प्रशासनाने कडक भूमिका न घेतल्याने या मोहिमेला खिळ बसली असल्याची खंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने २०१४-१५ साठी उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये जिल्हाभरातील एकूण तालुक्यांपैकी कोणत्याही तालुक्याने उद्दिष्टपूर्ती केली नाही. तरीही झालेल्या उद्दिष्टामध्ये औसा तालुका आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The target for mineral operations is only 28%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.