नाला सरळीकरणासाठी ५०० कि.मी.चे लक्ष्य
By Admin | Updated: May 22, 2015 00:33 IST2015-05-22T00:20:53+5:302015-05-22T00:33:33+5:30
हणमंत गायकवाड , लातूर जलयुक्त शिवार अभियानात लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे २०० कि.मी. अंतराचे काम पूर्णत्त्वास आले आहे.

नाला सरळीकरणासाठी ५०० कि.मी.चे लक्ष्य
हणमंत गायकवाड , लातूर
जलयुक्त शिवार अभियानात लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे २०० कि.मी. अंतराचे काम पूर्णत्त्वास आले आहे. मे अखेर ५०० कि.मी. अंतराचे लक्ष्य ठेवून जिल्हाधिकारी दररोज जलयुक्त शिवार कामाचा आढावा घेत आहेत. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक दर सोमवारी तर होतेच. शिवाय, दिवसाला किमान एका कामाला भेट देऊन ऊर्जा वाढविण्याचे काम केले जात आहे.
लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०२ गावांत जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा सिलसिला सुरू आहे. लातूर तालुक्यातील २८, औसा ३५, निलंगा ३१, रेणापूर १६, शिरूर अनंतपाळ ९, उदगीर २२, अहमदपूर २२, चाकूर १८, देवणी ११, जळकोट १० अशा एकूण २०२ गावांमध्ये नाला सरळीकरण, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला बंधारा, हातपंपाचे पुनर्भरण, माती बंधारा, बंधाऱ्याचे नूतनीकरण, कोल्हापुरी बंधाऱ्याचे नूतनीकरण, दुरुस्ती, साखळी सिमेंट बंधारे, शेततळे, पुनर्भरण आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. शिवारातील पाणी शिवारात आणि गावातील पाणी गावात अडविण्यासाठी जलसंधारण, कृषी, जिल्हा परिषद अशा विविध विभागांमार्फत कामे केली जात आहेत. त्यात लोकांचा सहभाग वाढविला जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या सरासरीनुसार पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता करण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांचा आहे.
किल्लारी, उजनी, मातोळा, बुधोडा, खरोसा, रामेगाव, नकुलेश्वर बोरगाव, उंबडगा (खु.), बाणेगाव, उंबडगा (बु.), औसा, तळणी, कारला, लांबोटा, निलंगा, कलमुगळी, नेलवाड, औंढा, कासारशिरसी, बोळेगाव चिंचोली, लाळी, सताळा, वलांडी, देवणी, कव्हा, बामणी, पारधेवाडी, पाखरसांगवी, शिरसी, कातपूर, बाभळगाव, ईटी, शिवणी मांजरा, चामरगा, बाकली, डोंगरगाव बोरी आदी गावांत नाला सरळीकरण व खोलीकरण कामाने गती घेतली आहे. २१५ लाख रुपये खर्च करून ही कामे करण्यात येत आहेत. त्यात १२९.२४ लाखांचा लोकसहभाग आहे.