शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत तनवाणींची उडी

By Admin | Updated: December 27, 2015 00:26 IST2015-12-27T00:12:45+5:302015-12-27T00:26:36+5:30

औरंगाबाद : भाजपचे शहराध्यक्षपद मिळविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असताना आता या पदाच्या शर्यतीत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही उडी घेतली आहे

Taranvani's jump in city presidential race | शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत तनवाणींची उडी

शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत तनवाणींची उडी


औरंगाबाद : भाजपचे शहराध्यक्षपद मिळविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असताना आता या पदाच्या शर्यतीत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही उडी घेतली आहे. तनवाणी यांनीच प्रदेशाध्यक्षांकडे तशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठीची चुरस वाढणार आहे.
विद्यमान शहराध्यक्षांची मुदत संपत आली आहे. त्यामुळे पक्षात नवीन शहराध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. शहराध्यक्षांच्या निवडीआधी शहरातील वॉर्ड समित्या आणि मंडळ समित्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत वॉर्ड समित्यांची आणि १५ जानेवारीपर्यंत मंडळ समित्यांची निवड पूर्ण होणार आहे. त्यानंतर १६ जानेवारी ते २५ जानेवारीदरम्यान शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. हे पद मिळविण्यासाठी पक्षातील अनेकांनी लॉबिंग सुरू केली आहे. सद्य:स्थितीत पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, शहर सरचिटणीस विजय साळवे, माजी महापौर संजय जोशी आदींची नावे या पदासाठी चर्चेत आहेत; परंतु आता हे पद मिळविण्यासाठी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही प्रयत्न चालविले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत आलेल्या तनवाणी यांनी मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविलेली आहे; परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याआधी त्यांनी शिवसेनेत आमदार, महापौर अशी मोठी पदे भूषविलेली आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणतेच पद नसल्यामुळे अधिकाराचे पद मिळविण्याचा तनवाणी यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना गळ घातल्याचे समजते. दुसरीकडे अनिल मकरिये यांचीही स्थानिक आमदाराच्या माध्यमातून लॉबिंग सुरू आहे. याशिवाय संजय जोशी, विजय साळवे यांच्यासह पक्षातील इतरही काही जण शहराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या निवडीची चुरस वाढणार आहे.
भाजपने शहरातील सर्व वॉर्ड समित्यांच्या निवडीची प्रक्रिया पंधरा दिवसांपासून सुरू केली आहे. वॉर्ड समित्यांची निवड अंतिम टप्प्यात असून ती दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लगेचच मंडळ समित्यांची निवड होणार आहे. शहरात एकूण ९ मंडळे असून त्यांच्या समिती सदस्यांची निवड होणार आहे.

Web Title: Taranvani's jump in city presidential race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.