तंटामुक्त समित्या निवडीवरून तंटे
By Admin | Updated: July 1, 2014 01:02 IST2014-07-01T00:07:34+5:302014-07-01T01:02:04+5:30
कडा: गावात निर्माण झालेले तंटे गावातच सोडविले जावेत या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या समिती स्थापनावरूनच गावा-गावात वाद होऊ लागले आहेत.

तंटामुक्त समित्या निवडीवरून तंटे
कडा: गावात निर्माण झालेले तंटे गावातच सोडविले जावेत या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या समिती स्थापनावरूनच गावा-गावात वाद होऊ लागले आहेत. यामुळे अनेक ठिकाणच्या समित्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यामुळे वर्षभरात १२२ पैकी एकाही समितीने एकही तंटा मिटविलेला नाही. यामुळे या समित्यांना आपल्या कामांचा विसर पडल्याचा आरोप होत आहे.
आष्टी तालुक्यातील आष्टी, अंभोरा या पोलीस ठाण्यांतर्गत १२२ ग्रामपंचायती येतात. या गावांमध्ये उद्भवलेले वाद गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यात येते. यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारीही प्रयत्न करतात.
गावामध्ये तंटे होऊन ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा तंट्यामुळे ग्रामस्थांना पोलीस ठाण्यात खेटे घालावे लागतात. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड तर पडतोच; शिवाय वेळही वाया जातो. असे प्रकार आष्टी तालुक्यात होऊ नयेत यासाठी १२२ ठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. असे असले तरी धानोरा, डोंगरगण, शेरी, जळगाव, हातोला, धामनगाव, दौलावडगाव, सावरगाव, कारखेलसह इतर एकाही ठिकाणच्या समितीने या वर्षात एकही तंटा मिटविला नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. यासह अनेक ठिकाणच्या समित्या केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते. या समितीचे अध्यक्षपद हे ग्रामसभेने ठरविणे गरजेचे असते. अध्यक्षपदासह सदस्यही ग्रामपंचायतने ठरविणे अपेक्षीत आहे. असे असताना आष्टी तालुक्यातील अनेका ठिकाणच्या समित्यांमधील अध्यक्षांसह सदस्यही सरपंच व ग्रामसेवकांनी परस्परच ठरविले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे.
या समित्यांमधील अध्यक्ष व सदस्य ग्रामस्थांना विचारात न घेता निवडले गेल्याने इतर ग्रामस्थांमध्ये या समित्यांविषयी रोष आहे. यामुळे गावामध्ये निर्माण झालेला तंटे सोडविण्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा यावरही खल होतो.
सदरील योजना २००५ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायतला जिल्हा तसेच राज्य स्तरीय बक्षीसही देण्यात येते. यामुळे सुरुवातीला या मोहिमेमध्ये ग्रामपंचायतने हिरीरीने सहभाग घेतला होता. आता मात्र या समित्यांमध्ये राजकारण शिरू लागल्याने अनेक ठिकाणी या समित्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या उद्देशालाच खीळ बसली आहे. यामुळे या समित्यांमध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी दादा गव्हाणे, सचिन वाघुले यांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या शेतीच्या बांधासह इतर किरकोळ कारणांवर वाद होत आहेत. असे प्रकार मिटविण्यासही कोणी पुढाकार घेत नाही. असे प्रकार होऊ नये, म्हणून काही समित्यांना पुनर्रचना करण्याची मागणी अशोक वाघुले यांनी केली आहे. पोनि शशिकांत डोके म्हणाले, समित्यांविषयी वाद मिटवू व तंटे मिटविण्याचे प्रयत्न करू. (वार्ताहर)