टँकरची २५ कोटी रुपयांची देयके रोखली
By Admin | Updated: March 3, 2017 01:20 IST2017-03-03T01:18:05+5:302017-03-03T01:20:13+5:30
बीड : टँकरच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेबाबत तक्रार दाखल झाल्यामुळे तब्बल २५ कोटी रुपयांची देयके जिल्हा परिषदेने रोखून धरली आहेत.

टँकरची २५ कोटी रुपयांची देयके रोखली
बीड : गतवर्षी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, टँकरच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेबाबत तक्रार दाखल झाल्यामुळे तब्बल २५ कोटी रुपयांची देयके जिल्हा परिषदेने रोखून धरली आहेत.
अल्प पर्जन्यमानामुळे गतवर्षी पाण्याची पातळी सहा मीटरपेक्षा खाली गेली होती. परिणामी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या गाव पातळीवरील योजनांचे उद्भव आटले होते. विहीर, बोअरही तळाला गेले होते. त्यामुळे टँकरशिवाय पर्याय उरला नव्हता. ऐनवेळी गावागावांतून टँकरची मागणी वाढल्यानंतर शासनाने तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार दिले होते.
दरम्यान, कंत्राटदारांनी दाखविलेल्या टँकरच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेची शाखा अभियंता व उपअभियंता यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. टँकरच्या प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा अधिक क्षमता असल्याचे दाखवून बिले लाटण्याचा होत असल्याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अॅड. अजित देशमुख यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी चौकशीचे आदेश जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांना दिले. त्यानंतर कंत्राटदारांचे तब्बल २५ कोटींचे देयक रोखण्याचा निर्णय जि.प.ने घेतला आहे. जिल्ह्यात ८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत टँकरने पाणीपुरवठा झाला. जून २०१६ अखेर टँकरचा आकडा ९८१ पर्यंत पोहोचला होता. (प्रतिनिधी)