पाऊस लांबल्याने टँकर गेले सहाशेवर..!
By Admin | Updated: June 16, 2016 00:04 IST2016-06-15T23:55:47+5:302016-06-16T00:04:51+5:30
जालना : ७ जूनला पडणारा मृग नक्षत्राचा पाऊस अद्यापही बरसला नसल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आत्ता वाढीव म्हणजेच ६०० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाऊस लांबल्याने टँकर गेले सहाशेवर..!
जालना : ७ जूनला पडणारा मृग नक्षत्राचा पाऊस अद्यापही बरसला नसल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आत्ता वाढीव म्हणजेच ६०० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस लांबल्यास जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यातच टँकरच्या नियमित फेऱ्या होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
आठही तालुक्यातील मध्यम आणि लघुप्रकल्प कोरडे पडल्याने पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात ५५० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. जून महिन्यात पाऊस पडेल या आशेवर टँकरची संख्या होऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशी चिन्हे होती. परंतु अद्यापही पाऊस पडला नसल्याने ५० टँकरची वाढ होऊन आकडा ६०० वर पोहचला आहे.पाणीपुरवठ्यावर जि.प. कडून लाखो रूपये खर्च करण्यात येत असून सुध्दा नागरिकांनी नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गावातील लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा होत नसल्याचा तक्रारी आहेत. काही दिवस पाऊस लांबल्यास पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. यासाठी आत्तापासून बीडीओ आणि तहसील कार्यालयाकडून नियोजन करण्याची गरज आहे. कारण टँकरसाठी आरक्षित करण्यात आलेल्या विहिरी,कूपनिलकांच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.
जिल्ह्याला परफेक्ट रोडलाईन या खाजगी एजन्सी मार्फत टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे काम दिले गेले आहे. त्या त्या तालुक्याचे बीडीओ आणि तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली टँकरच्या नियमित फेऱ्या होतात की नाही याची पाहणी करण्याची जिम्मेदारी दिली आहे. परंतु अधिकारी कर्मचाऱ्याच्या मिलिभगतमुळे अनेक गावात नेमून दिलेल्या टँरच्या फेऱ्याच होत नसल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पाण्यावरून राजकारण करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. वाडी-वस्त्यांवरील पाणीटंचाई पाहता जादा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. (प्रतिनिधी)