शौचालय स्वच्छतेसाठी न.प.वर ‘टमरेल’ मोर्चा
By Admin | Updated: August 7, 2014 23:33 IST2014-08-07T23:15:11+5:302014-08-07T23:33:36+5:30
बीड: शहरातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला व पुरुषांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.

शौचालय स्वच्छतेसाठी न.प.वर ‘टमरेल’ मोर्चा
बीड: शहरातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला व पुरुषांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. या विरोधात गुरुवारी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बीड नगर परिषदेवर ‘टमरेल’ मोर्चा काढण्यात आला.
शहरातील माळीवेस परिसरातील शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मागील दोन महिन्याच्या काळात अनेकवेळा बीड नगर परिषदेला स्वच्छता करण्याबाबत विनंती करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गुरुवारी बीड नगर परिषदेवर टमरेल मोर्चा काढून नगर परिषदेच्या विरोधात निषेध नोंदवून घोषणाबाजी केली. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असल्याचे पहावयास मिळत आहे. तीन वर्षांपूर्वी बीड नगर परिषदेने शहरात काही ठिकाणी शौचालय बांधले होते. मात्र शौचालयात पाण्याची देखील व्यवस्था नाही. यामुळे शौचालय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत अनेकवेळा बीड न.प.ला कळवून देखील शहरातील शौचालयाची स्वच्छता केली नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी सांगितले.
माळीवेस परिसरात ऐन चौकातच न.प.चे शौचालय आहे. शौचालयाभोवती गाजर गवत उगवलेले आहे. त्याबरोबरच येथील गटारी देखील अनेक महिन्यांपासून तुंबलेल्या आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झालेली आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मोर्चाप्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी बीड नगर परिषदेचा परिसर दणाणून गेला होता.
मोर्चाला अभिमान उजगरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाघमारे, शहराध्यक्ष सतीश विद्यागर, जिल्हा सहसंघटक गौतम सिरसट, तालुकाध्यक्ष भीमराव पायाळ, सागर कांबळे, तालुुका संघटक अजय वाघमारे यांची उपस्थिती होती. मोर्चामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)