तेलगावात फुटला आश्रूंचा बांध !
By Admin | Updated: May 27, 2015 00:41 IST2015-05-27T00:16:00+5:302015-05-27T00:41:27+5:30
बीड : वंचित, उपेक्षित घटकांसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या अॅड. एकनाथराव आवाड यांना जड अंत:करणाने मंगळवारी तेलगाव (ता. धारुर) येथे हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला

तेलगावात फुटला आश्रूंचा बांध !
बीड : वंचित, उपेक्षित घटकांसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या अॅड. एकनाथराव आवाड यांना जड अंत:करणाने मंगळवारी तेलगाव (ता. धारुर) येथे हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. अमर रहे... अमर रहे... अशा घोषणा देत कार्यकर्ते एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते.
मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून सामान्यांचा स्वाभिमान जागवत त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अॅड. आवाड यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. ५० हजार कुटुंबियांना त्यांनी गायरान मिळवून देत हक्काची लढाई लढली होती. एकनाथराव आवाड यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेलगावात मोठी गर्दी झाली होती. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. नेल्सन मंडेला वसाहतीत आवाड यांचे पार्थिव अंत्यदर्शनाकरता ठेवले होते. यावेळी अंतिम दर्शनासाठी लांबलचक रांगा लावाव्या लागल्या.
सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघाली. या यात्रेत हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष सहभागी होते. आवाड यांनी महिलांच्या स्वावलंबनासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अनेक पीडितांना आधार दिला. अशा हजारो महिला हुंदके देत, आश्रू गाळत होत्या. अंत्ययात्रेत महिलांनीच पार्थिवाला खांदा दिला.
बौद्धधम्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी आवाड यांच्या पार्थिवास अग्नीडाग दिला.
वाहतूक दीड तास ठप्प
अॅड. आवाड यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून नेते, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मंडळी आली होती. अंत्यसंस्कार आटोपल्यावर तेलगाव चौकापासून ते नेल्सन मंडेला वसाहत व वसाहत ते माजलगाव रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. वाहने, पादचारी एकाचवेळी रस्त्यावर आल्याने दीड तास वाहतूक ठप्प झाली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. आ. जोगेंद्र कवाडे म्हणाले, एकनाथरावांनी अनेक वर्षे संघर्ष केला. चळवळीतील खंबीर व धाडसी नेते संपत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करुन आवाड यांच्यासोबतच्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या.अनेक आंदोलनात सोबत होतो, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांना आ़श्रू अनावर झाले.
रिपाइं नेते गौतम भालेराव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी त्यांनी मातंग समाजात केली होती. आंबेडकरी चळवळीतील बहुआयामी नेता म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरुन न येणारी आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकनाथराव आवाड यांनी आयुष्यभर शोषित, पीडितांची बाजू लावून धरल्याचे सांगितले. सामान्यांना उन्हातून सावलीत आणणारा हा नेता अचानक सोडून गेल्याने धक्का बसल्याचे ते म्हणाले.आ. विवेक पंडित, आ. जयदेव गायकवाड, बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे, कॉ. विठ्ठल मोरे, लक्ष्मण माने, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील, पप्पू कागदे, अजिंक्य चांदणे यांनी देखील एकनाथराव आवाड यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यकतृत्वाचा आढावा घेतला. एकनाथराव आवाड हे चळवळीतील रखरखता निखारा होते, त्यांच्या जाण्याने चळवळीने मोठा उर्जास्त्रोत गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)