तलाठी बेपत्ता, दलालांचीच सत्ता
By Admin | Updated: June 23, 2014 23:57 IST2014-06-23T23:57:26+5:302014-06-23T23:57:26+5:30
बीड: ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय सोमवारी जिल्हाभरातील तलाठी कार्यालयांवर आला़

तलाठी बेपत्ता, दलालांचीच सत्ता
बीड: ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय सोमवारी जिल्हाभरातील तलाठी कार्यालयांवर आला़ मंत्रालयातील काम लवकर होईल पण तलाठी कार्यालयातील काम होईलच याची शाश्वती देता येणार नाही़ सोमवारी ‘टीम लोकमत’ ने जिल्ह्यातील ३७४ तलाठी सज्जांपैकी १०० सज्जांवर एकाच वेळी भेट देऊन पाहणी केली़ यातून पुढे आलेले वास्तव धक्कादायक आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीतरी तलाठी कार्यालयात हजर असतील या अपेक्षेने हातात कागदाचा पुडका घेऊन अर्धशिक्षित शेतकरी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवून दमतात तरी देखील तलाठ्यांना घाम फुटत नाही. प्रत्येक तलाठ्याने एक दलाल सजावर ठेवलेला आहे़ तलाठी कार्यालयाचे काम एका हेलपाट्यात झाले असे म्हणारा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. याचा अनुभव सोमवारी स्टींग आॅपरेशन मुळे निदर्शनास आला. एकाच वेळी जिल्ह्यातील तलाठी सज्जांवर जाऊन तलाठी कार्यालयाच्या ‘कारभाराची’ पाहणी केली़ यातून पुढे आलेले हे वास्तव.(टीम लोकमत, बीड)
आष्टीत २२ तलाठी एकही नाही सज्जाच्या ठिकाणी
आष्टी तालुक्यातील ४५ तलाठी सज्जापैकी दहा ते बारा तालाठी सज्जांवर सोमवारी सकाळी साडेदहा ते आकराच्या दरम्यान लोकमत प्रतिनिधीने भेट दिली़ यादरम्यान तालुक्यातील तलाठी सज्जांना कुलुप ठोकलेले आढळून आले़ मात्र आपले काम घेऊन आलेले नागरिक तलाठ्याची वाट पहात कार्यालया समोर बसले होते़
काही तलाठी सज्जांवर तर दलालच तलाठी कार्यालय सांभाळत असल्याचे पहावयास मिळाले़ यामध्ये आष्टी तालुक्यातील कसबे कडा, कडा शहर, चोभानिमगाव, कानडी खुर्द येथील तलाठी कार्यालयांना सकाळी आकरा वाजता कुलूप होते़ तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांश तलाठी कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच आष्टी येथे थाटण्यात आलेले असल्याचे निदर्शनास आले़ सावरगाव येथील तलाठी कार्यालय कडा येथे थाटण्यात आले आहे़ हे कार्यालय सोमवारी सुरू होते़ मात्र येथे संबंधित तलाठी हजर नव्हते़ सर्व कारभार ठेवलेला दलालच पहात होता़ एवढेच नाही तर सातबारा, आठ अ देण्याचे काम देखील दलालच करताना लोकमतच्या पाहणीत आढळून आला़ विशेष म्हणजे शासनाची महत्वाची कागदपत्रे देखील खाजगी दलालाच्या ताब्यात असल्याचे आढळून आले़
ताटकळत बसावे लागते
असा एकही माणूस सापडणार नाही की, त्याचे उभ्या आयुष्यात महसूल च्या एखाद्या कार्यालयात काम पडले नाही़ महसूलमधील तलाठी कार्यालय हे एक कार्यालय असे आहे़ ज्या कार्यालयात प्रत्येकाचे काम असते़ मात्र तलाठी कार्यालयातून काम करून घेण्याचा अनुभव काय असतो हे प्रत्यक्ष तलाठ्याकडे काम घेऊन गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांना विचारला तर ते सांगतील़ जिल्ह्यातील बहुतांश तलाठी कार्यालयांवर सगळी कामे सोडून तलाठी कार्यालया समोर तासन्तास भाऊसाहेबांची (तलाठी) वाट पहात बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पाहिले़ की, तलाठ्यांच्या कार्यकत्तृत्वाची ओळख होते़
तलाठी कार्यालयाच्या दारातच थाटला पत्त्याचा क्लब
केज तालुक्यातील कोरेगाव, मस्साजोग, काळेगाव घाट, साळेगाव, चिंचोलीमाळी, वरपगाव, हनुमंत पिंप्री आदी ठिकाणच्या तलाठी सज्जावर अचानक भेटी दिल्या असता सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजे पर्यंत एकही तलाठी कार्यालय उघडले नव्हते़ बंद कार्यालया समोर नागरीक कामासाठी तलाठ्याची वाट पहात ताटकळत उभे ठाकले होते़ केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथील तलाठी कार्यालयाच्या बाहेर तर चक्क पत्याचा क्लब सुरू असल्याचे लोकमतच्या पहाणीत आढळून आले़
असा झाला सौदेबाजीचा संवाद
नागरिक: भाऊसाहेब माझ्या वडिलांच्या नावावरील जमीन माझ्या नावावर लावयची आहे़ त्यासाठी सही पाहिजे़
तलाठी: अहो़़ फेरफार वढायला तर शासनानं आम्हाला इथं बसवलंय
नागरिक: मी माझ्या बरोबर कागदं आनलेत़ यावर सह्या करा़
तलाठी: आज माझ्या मागे ट्रेनिंगचे काम आहे़ उदया बीडला या सही करतो़
नागरिक: (बीडला आल्या नंतर) बीड आल्यावर सही करतो म्हणाला होतात़ आता करा सही़
तलाठी: सही करतो़ आधी भवानी करा़
नागरिक: तुमच्या कार्यालयातल्या दलालाकडे पाचशे दिलेत़
तलाठी: अजून पाचशे द्या़
नागरिक: चारशे घ्या़
तलाठी: जमत नाही़ आज माझ्या मागं ‘ट्रेनिंगचे’ काम आहे़
नागरिक: बरं घ्या पाचशे़ करा सही़
(बीड तालुक्यातील एका सज्जावरील तलाठ्याकडून फेर ओढून घेताना पैसे दिल्याशिवाय तलाठ्याने काम केले नाही. यावेळी झालेला हा संवाद असून याची चित्रफित ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.)
बहुतांश तलाठी कार्यालये अंबाजोगाई शहरातच
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांशी तलाठी कार्यालये अंबाजोगाईतच थाटलेली आहेत. प्रत्येक सज्जाचे तलाठी अंबाजोगाईत बसून कामकाज करतात. गावोगावी प्रत्येक सज्जाच्या ठिकाणी प्रशासनाने स्वतंत्र इमारती सज्जाला बांधून दिल्या. तरीही कार्यालयीन कामकाज अंबाजोगाईतूनच चालते. परिणामी गावोगावच्या ग्रामस्थांना आपल्या कामकाजासाठी अंबाजोगाईला खेटे मारावे लागतात.
अंबाजोगाई तालुक्यातून लोकमतच्या वतीने घाटनांदूर, पट्टीवडगाव, पाटोदा, लोखंडी सावरगाव, बर्दापूर राडी, अशा विविध ठिकाणी लोकमत टीमच्या वतीने पाहणी करण्यात आली. यावेळी बहुतांशी कार्यालये बंद स्थितीतच आढळून आले.
अनेक तलाठ्यांनी अंबाजोगाईतच आपली कार्यालये थाटल्याने ग्रामस्थांना आपल्या कामासाठी थेट अंबाजोगाई गाठावी लागते.
तालुक्यातील पाटोदा येथील तलाठी सज्जा कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून बंद स्थितीतच आहे. बर्दापूर येथील कार्यालयही सकाळी १२ वाजेपर्यंत उघडले गेले नव्हते. अशी स्थिती इतरही कार्यालयांची आहे.
ताबा नसल्याने तलाठी सज्जाची इमारत धूळ खात पडून
तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे तलाठी सज्जाचे बांधकाम पूर्ण होऊन दोन ते अडीच वर्षे होऊ गेले तरी अद्याप महसूल विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी यांनी पाहणी देखील केली नाही. सदरील तलाठी सज्जा लहान मुलांचे खेळणी घर म्हणून उयोग होत आहे.
तलाठी सज्जाच्या या इमारतीत तीन खोल्या संडास, बाथरूमचे दरवाजे त्याचे कुलूप आदी साहित्याची नासधूस झाली आहे. इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे व चुकीच्या जागी झाल्याची चर्चा ग्रामस्थ करतांना दिसत असून अशा शासनाच्या कित्येक मिारती बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा नियोजन व शासकीय यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष असल्याने लोखंडी सावरगाव हद्दीत मनोरुग्णालयाचे झालेले पूर्ण बांधकाम, मंडळी अधिकारी कार्यालय व निवास्सथानाची इमारत, शंभर खाटांचे महिला रुग्णालयाचे कासव गतीने होणारे बांधकाम याकडे संबंधित विभागाने चौकशी करून पूर्ण झालेले बांधकामाच्या इमारती व कार्यालये ताब्यात घेण्यात यावे, असे आदेश देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
अंबाजोगाई तालुक्यात महसूली १०७ गावे असून २९ तलाठी सज्जे आहेत. मात्र, अंबाजोगाईत केवळ २१ तलाठी, २९ सज्जांचा कारभार चालवतात. आठ सज्जे रिक्त असल्याने अनेक सज्जांचा पदभार इतर गावच्या सज्जांकडे सोपविण्यात आला आहे. परिणामी याचा त्रास गावोगावच्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात अंबाजोगाईचे तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता तलाठ्यांची रिक्त पदे असल्यामुळे आहे त्यांच्याकडे इतर सज्जांचा पदभार सोपवण्यात आल्याने ग्रामस्थांची तारांबळ होत आहे. मात्र, त्या त्या तलाठी सज्जावर तलाठ्यांनी दिलेल्या दिवशी उपस्थित रहावे यासाठी आपण कारवाई करणार असल्याचे पाटील म्हणाले.
असे केले स्टींग
जिल्हयातील आकरा तालुक्यातील शंभर तलाठी कार्यालयाची निवड केली़ व सर्व तालुका प्रतिनिधी, वार्ताहरांनी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान निवडलेल्या तलाठी सज्जांवर जाऊन पहाणी केली़ निवडलेल्या नव्वद ते शंभर तलाठी सज्जांपैकी ७० तलाठी कार्यालये चक्क आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बंद होते तर काही कार्यालयांवर तलाठ्यांनी परस्पर नेमलेले दलालच कारभार पहात होते़
अशी आहे तलाठी सजांची स्थिती
तालुका सज्जेकार्यरत तलाठीरिक्त पदे
बीड ६४४९ १५
पाटोदा २२११ ११
शिरूर कासार२११८ ०३
आष्टी ४५२२ २३
अंबाजोगाई २९२१ ०८
धारूर १६०६ १०
केज ४०२८ १२
परळी २९१८ ११
वडवणी १४०९ ०५
माजलगाव ३७२२ १५
गेवराई ५७२९ २८