तलाठी हजर; दलालांचा पोबारा!

By Admin | Updated: June 28, 2014 01:17 IST2014-06-28T00:49:08+5:302014-06-28T01:17:35+5:30

जालना : बहुतांश तलाठ्यांनी वेळेवर आप-आपल्या सज्जात दाखल होत, लगबगीने ग्रामस्थांची कामे हातावेगळी करण्यास सुरूवात केली.

Talathi present; Brokers! | तलाठी हजर; दलालांचा पोबारा!

तलाठी हजर; दलालांचा पोबारा!

जालना : बहुतांश तलाठ्यांनी वेळेवर आप-आपल्या सज्जात दाखल होत, लगबगीने ग्रामस्थांची कामे हातावेगळी करण्यास सुरूवात केली. तर अनेक ठिकाणी कार्यरत असलेल्या दलालांनी पोबारा केल्याचे चित्र शुक्रवारी बहुतांश सज्जावर आढळून आले.
लोकमतने गुरूवारी स्टींग आॅपरेशन करून जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६० तलाठी सज्जांची प्रत्यक्ष पाहणी केली. या स्टींग आॅपरेशनमध्ये निवडलेल्या तलाठी सज्जांपैकी बहुतांश तलाठी कार्यालये कार्यालयीन वेळेत बंद होती. काही कार्यालयांवर तलाठ्यांनी परस्पर नेमलेले दलालच मानेइतबारे कारभार पाहत असल्याचे आढळून आले. ग्रामस्थही दलालांनाच साहेब म्हणत त्यांच्याकडूनच कामे उरकतांना दिसत होते. काही ठिकाणी एकाच कार्यालयात अनेक सज्जांचे कामकाज सुरू होते. एका तलाठ्यावरच पाच-सहा सज्जांचा पदभार आहे. काही तलाठ्यांना मंडळ अधिकारी पदाचाही अतिरिक्त पदभार आहे. या सर्व धक्कादायक बाबी समोर आल्या.
या स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो, यावर पूर्णपान प्रकाशझोत टाकण्यात आला. शुक्रवारी वृत्त प्रकाशित होताच महसूल प्रशासनासह तलाठी खडबडून जागे झाले.
कार्यालयाकडे आठवड्यातून एकदाच येणारे तलाठी शुक्रवारी कार्यालयीन वेळेत हजर झाले. आपल्यानंतर लगबगीने ग्रामस्थांची कामे करण्यास सुरूवात केली. ज्या ठिकाणचा कारभार संपूर्णपणे दलालांच्या हातात होता, त्याही ठिकाणी तलाठी हजार झाले. आपल्या पंटरांना काढून देत स्वत:च कामे हाती घेतली. अनेक ठिकाणच्या दलालांनी पोबारा केल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान, भोकरदन तालुक्यातील बहुतांश कार्यालयात तलाठी वेळेत हजर झाले. भोकरदनच्या तलाठ्यांनी आपला लॅपटॉप तात्काळ दुरूस्त करून घेतला. सकाळपासूनच ग्रामस्थांची कामे करण्यास प्रारंभ केला.
कुंभारपिंपळगाव, घनसावंगी, वाटुरफाटा, आष्टी, तळणी, टेंभूर्णी, अकोलदेव येथील कार्यालयातही आज कार्यालयीन वेळेत तलाठी आपल्या कामात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले.
ग्रामस्थांतून समाधान
शेतकरी, ग्रामस्थांसह विद्यार्थी छोट्या-मोठ्या कामांनिमित्त तलाठ्यांच्या शोधार्थ फिरत असतात. गावात तलाठी येत नाहीत, तालुक्यालाही ते भेटत नाहीत, त्यांचे मोबाईलही बंद असतात. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे खोळंबलेली असतात. सध्या पीक कर्जाचे वितरण सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यान्ना सातबारा तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी तलाठ्याची नितांत गरज पडत आहे. या पार्श्वभूमीवर स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून तलाठी, दलाल यांच्या कारभाराचे वास्तववादी चित्र समोर आणल्याबद्दल विविध ठिकाणच्या ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)
तलाठी खडबडून जागे!
शुक्रवारच्या अंकात स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून वास्तव चित्र दाखविल्यानंतर महसूल प्रशासन आणि तलाठी खडबडून जागे झाले. जिल्ह्यातील बहुतांश सज्जा कार्यालयांमध्ये तलाठी दाखल झाले. ग्रामस्थांची कामे हातात घेतली.

Web Title: Talathi present; Brokers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.