लाच घेताना तलाठी व त्याचा साथीदार अटकेत
By Admin | Updated: August 21, 2014 00:12 IST2014-08-21T00:01:06+5:302014-08-21T00:12:37+5:30
औरंगाबाद : वाटणीपत्र तयार करून फेर ओढण्यासाठी एका शेतकऱ्याकडून २२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.

लाच घेताना तलाठी व त्याचा साथीदार अटकेत
औरंगाबाद : वाटणीपत्र तयार करून फेर ओढण्यासाठी एका शेतकऱ्याकडून २२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.
जगन्नाथ बापूराव लोखंडे (३९, रा. कासलीवाल तारांगण, पडेगाव) असे त्या तलाठ्याचे नाव आहे. त्याच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणाऱ्या सहायकाचे नाव कचरू बाबूराव सवई (४०) असे आहे. हे दोघे देवगाव रंगारीतील माटेगाव सज्जात कार्यरत आहेत.
या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, कन्नड तालुक्यातील माटेगाव येथील संजय शेलार यांची साडेपाच एकर जमीन आहे. त्यातील काही जमीन त्यांना पत्नीच्या नावे करायची होती. त्यासाठी त्यांनी वाटणीपत्र करून पत्नीच्या नावे फेर घेण्यासाठी अर्ज केला. या कामासाठी तलाठी लोखंडेने तब्बल ७५ हजार रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती २२ हजारांवर सौदा ठरला. हे पैसे घेऊन बुधवारी तलाठी कार्यालयावर या, असे लोखंडेने सांगितले. पैसे देण्याची इच्छा नसल्याने शेलार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले आणि तक्रार केली.