वेतनासाठी शिक्षकांचे धरणे
By Admin | Updated: June 27, 2014 00:16 IST2014-06-26T23:46:45+5:302014-06-27T00:16:18+5:30
औंढा नागनाथ : तालुक्यातील शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही.

वेतनासाठी शिक्षकांचे धरणे
औंढा नागनाथ : तालुक्यातील शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही. रखडलेले वेतन त्वरीत देण्यात यावे यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवारी पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
जवळपास तीन महिने झाले तरी शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. शालार्थ प्रणालीच्या गोंडस नावाखाली शिक्षकांचे वेतन लांबणीवर पडत असल्याने शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
औंढा तालुक्यातील शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे मुलांचे शैक्षणिक प्रवेश, बँका- पतसंस्था यांच्या कर्जाचे हप्ते थकल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
ही बाब लक्षात घेऊन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन पार पडले. तालुक्यातील शिक्षकांचा एप्रिल व मे महिन्याच्या पगाराचा प्रश्न मार्गी लावावा, वेतन उशिरा करणाऱ्यावंर कार्यवाही करावी, शालेय पोषण आहाराचे बिल त्वरीत द्यावे, अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम कपात करू नये, गटसाधन केंद्रातील कर्मचारी-साधनव्यक्ती, अभियंता, लेखापाल आदींवी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अंकुश ठेवावा. हे कर्मचारी कार्यालयीन वेळेत आढळून न आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करावी, आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोसे यांना देण्यात आले.
तसेच गटशिक्षणाधिकारी शिकारे यांनी निवेदन स्विकारून आंदोलनकर्त्या शिक्षकांशी चर्चा केली. या धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे औंढा तालुकाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष श्याम माने, सचिव शेषराव बांगर, जिल्हा प्रवक्ता इर्शाद पठाण, विजय बांगर, विलास सुरवसे, बालाजी तारे, अंतेश्वर अंबरबंडे, बालाजी काळे, किरण राठोड, विलास सुरवसे, चंद्रकांत सूर्यवंशी, बंडू काळे, मधुकर खणके, परसराम बर्गे, विजय महामुने, अमोल गवते, विठ्ठल शेप, अमोल मोगल, विष्णू गिते, पोफाळकर, शेळके, बनसोडे, धर्मा ठाकूर यांच्यासह तालुक्यातील शिक्षकांनी भाग घेतला. (वार्ताहर)