छत्रपती संभाजीनगर : अकरा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पतीने सासुरवाडीत जाऊन पत्नीची लोखंडी रॉडने हत्या केल्याची घटना महूनगर भागात सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी सातारा पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
भारती विठ्ठल वाघ (२४) असे मृत विवाहितेचे तर पतीचे विठ्ठल उत्तम वाघ (२८, रा. बोधेगाव, ता. फुलंब्री) असे नाव आहे. सातारा पोलिस ठाण्यात राधाकिसन आसाराम गरबडे (रा. बजाज हॉस्पिटलसमोर, महूनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी भारतीचा जानेवारी २०२४ मध्ये विठ्ठलसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर भारती ही पती विठ्ठल, सासू, सासरे व नातेवाइकांसोबत बोधेगाव येथे राहिली. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती-पत्नी कामानिमित्त शहरात राहायला आले. ते बजाज हॉस्पिटलच्या पाठीमागे राहू लागले. तेथे विठ्ठल भारतीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यावरून तो तिला सतत त्रास देत होता. वाद होऊ लागल्यामुळे दोघे पुन्हा गावी राहण्यास गेले. तेथेही भारतीला त्रास सुरू होता. तेव्हा भारतीचे वडील राधाकिसन गरबडे हे ८ डिसेंबर रोजी बोधेगावला जाऊन मुलीला माहेरी घेऊन आले. तेव्हापासून ती महूनगरमध्ये राहत होती.
सोमवारी सकाळी भारतीची आई रंजना आणि भाऊ राहुल हे दोघे नोकरीनिमित्त बाहेर पडले. तिची वहिनी कामानिमित्त बाहेर गेली. ११:३० वाजता तिचे वडील पैसे काढण्यासाठी एसबीआय बँकेत गेले. तेव्हा घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षांची मुलगीच होती. हीच संधी साधून आरोपी विठ्ठल वाघ हा १२:३० ते १ वाजेच्या सुमारास महूनगरात आला. तेथे भारतीसोबत त्याचा पुन्हा वाद झाला. तेव्हा त्याने चक्राकार दात्र्या असलेला लोखंडी रॉड मारून तिचे डोके फोडले. ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर आरोपी पळून गेला. शेजाऱ्याने घटनेची माहिती तिच्या वडिलांना दिली. वडील तात्काळ घरी आल्यानंतर भारतीला घाटी रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकारमृत भारतीच्या नातेवाइकांनी घाटी रुग्णालयातून रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर आरोपीच्या अटकेची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, सुरेश पाटील, पोलिस निरीक्षक संग्राम ताठे, सहायक निरीक्षक शैलेश देशमुख, उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी नातेवाइकांसोबत संवाद साधला. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती.