अधिग्रहणे, टँकर पुन्हा सुरू !
By Admin | Updated: August 18, 2016 00:56 IST2016-08-18T00:46:35+5:302016-08-18T00:56:16+5:30
उस्मानाबाद : पावसाळा सुरू होऊन दोन ते सव्वादोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप दमदार पाऊस झालेला नाही.

अधिग्रहणे, टँकर पुन्हा सुरू !
उस्मानाबाद : पावसाळा सुरू होऊन दोन ते सव्वादोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे भूजल पातळीमध्येही अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक गावांमध्ये पाणीप्रश्न कायम आहे. असे असतानाही शासनाच्या आदेशानुसार जिल्हाभरातील टँकर, अधिग्रहणे ३१ जुलै रोजी बंद करण्यात आली आहेत. हा प्रश्न ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी टंचाईग्रस्त गावांतील सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेतली. तसेच शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर अखेर शासनाने टंचाईग्रस्त गावांमध्ये गरजेनुसार टँकर, अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील टंचाईग्र्रस्त गावांना मोठा दिलासा
मिळाला आहे.
जिल्हा मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. यंदा पावसाने चांगली सुरूवात केली. परंतु, अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे उस्मानाबाद, कळंब, भूम, वाशीसह परंडा तालुक्यातील खरीप पिके सुकू लागली आहेत. दरम्यान, दमदार पावसाअभावी बहुतांश प्रकल्पांच्या घशाची कोरड कायम आहे. असे असतानाच शासन निर्णयाचा दाखला देत ३१ जुलैपासून टँकर तसेच अधिग्रहणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे टंचाईच्या झळा सोसणाऱ्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. परिणामी टँकर तसेच अधिग्रहणाचे प्रस्ताव त्या-त्या तहसील कार्यालयाकडे धडकू लागले होते. उपाययोजना बंद केल्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. दरम्यान, सदरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी टंचाईग्रस्त गावचे सरपंच, ग्रामसेवक तसेच त्या-त्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची बैठक लावून आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर अक्षरश: प्रश्नांची सरबत्ती केली. सदरील बैठकीनंतर आमदार पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला गरज असेल तेथे टँकर सुरू करण्याबाबत सूचना केल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन विभागचे अपर सचिव डॉ. मालिनी शंकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील पाणीटंचाईची दाहकता त्यांच्यासमोर मांंडली होती. या सर्व पाठपुराव्यानंतर शासनाने १७ आॅगस्ट रोजी कळंब, उस्मानाबाद या दोन तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची पहिली यादी जाहीर केली आहे. सदरील गावांमध्ये आवश्यकतेनुसार उपाययोजना पुन्हा सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.