बाराशे नाही तेराशे घ्या, पण पाणी शुद्ध द्या
By Admin | Updated: August 3, 2014 01:13 IST2014-08-03T00:28:36+5:302014-08-03T01:13:53+5:30
धर्माबाद : पालिकेच्या वतीने शहरवासियांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक संताप करीत आहेत. यात नळपट्टीही १२०० रुपये करण्यात आली,
बाराशे नाही तेराशे घ्या, पण पाणी शुद्ध द्या
धर्माबाद : पालिकेच्या वतीने शहरवासियांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक संताप करीत आहेत. यात नळपट्टीही १२०० रुपये करण्यात आली, नळपट्टी १३०० रुपये घ्या पण शुद्ध पाणी द्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
मागील दहा वर्षांपासून पालिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. याकाळात कधीही टॅक्स वाढविण्यात आला नव्हता, आता मात्र पाणीटंचाईचे कारण दर्शवून पालिकेने ८०० रुपयांची नळपट्टी १२०० रुपयापर्यंत वाढविली आहे. त्यात शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला पाण्याची योजना मंजूर आहे, मात्र सत्ताधाऱ्यांनी लक्ष न दिल्याने पाणी योजना रेंगाळली आहे. विविध करापोटी जमा होणारा पैसा आणि शासनाकडून मिळणारे अनुदा पालिका पदाधिकाऱ्यांच्या ‘खिशात’ जात असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश गिरी यांनी केला. नदीला पाणी राहात नाही, हे पालिकेला माहित नव्हते काय? पालिकेने कोणतेही नियोजन न केल्यामुळे शहरात आज पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याचा आरोप आहे. शिक्षक कॉलनीतील बोअर मागील एक महिन्यांपासून बंद आहे, पालिका याकडे लक्ष देण्यास तयार नाही. पाणी पुरवठ्यासाठी जी पाईपलाईन करण्यात आली, ती चुकीची आहे. पाईपलाईन जमिनीखाली असावयास पाहिजे, ती जमिनीवर करण्यात आली. ये- जा करणाऱ्याला तिचा त्रास होत आहे. दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही तर पालिकेने नळपट्टी वाढ कशाला केली? असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख राजू शिरामणे यांनी केला. जोपर्यंत जनतेला फिल्टर पाणी दिले जात नाही, तोपर्यंत पालिकेने नळपट्टी वाढवू नये, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असे माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार राठोड यांनी म्हटले आहे.
आधी जनतेला शुद्ध पाणी द्या, नंतर १२०० नाही तर १३०० रुपये नळपट्टी घ्या, जनतेच्या आरोग्याशी खेळू नका, याचे परिणाम भोगावे लागतील, असे भारिप- बहुजन महासंघाचे तालुका संघटक निलेश वाघमारे यांनी म्हटले आहे. जनतेला पाणी दूषित येत असून, एक रुपयासुद्ध टॅक्स देणार नाही, अशी भूमिका मधुकर वाघमारे यांनी मांडली.
दूषित पाणीपुरवठा, त्यात एकदिवसाआड आणि नळपट्टीमध्ये वाढ करणे, हा एकूणच प्रकार घोर अन्याय करणारा आहे. जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य नसेल तर नळपट्टी घेणे बंद करा, अशी प्रतिक्रिया व्यंकट पा. मोरे यांनी दिली. गेट क्रमांक २ मध्ये तीन दिवसआड पाणी येते तर कधी येत नाही. फिल्टर विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे. १० ते १५ मिनीटेच नळाला पाणी येते, यावरुन महिलांमध्ये भांडणेही होत आहेत. वेळोवेळी सांगूनही पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. हा भाग नगराध्यक्षांचा वार्ड आहे, अशी प्रतिक्रिया भा.वि.से.तालुकाप्रमुख बालाजी बनसोडे यांनी दिली.
नळाला दूषित पाणी येत आहे, तेही एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
फिल्टरवाल्यांचा व्यवसाय मात्र चांगलाच जोर पकडून आहे. शुद्ध पाणी देता येत नसेल तर पालिका काय कामाची?असा सवाल कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वर्णी नागभूषण यांनी केला. फुलेनगरमध्ये खड्ड्यातून पाणी भरावे लागते, सदरचे पाणी सांडपाण्यासाठी वापरावे लागते, असे सुदर्शन वाघमारे यांनी सांगितले.(वार्ताहर)