पैसे फेका, पास मिळवा
By Admin | Updated: September 19, 2014 01:01 IST2014-09-19T00:37:02+5:302014-09-19T01:01:52+5:30
सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड आपण अपंग आहोत, आम्हाला बसच्या प्रवासभाड्यात ७५ टक्के सवलत आहे, असा गाजावाजा करीत बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर अनेकजण आजही

पैसे फेका, पास मिळवा
बोगस पास मिळवून देणाऱ्यांचे रॅकेट
सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड
आपण अपंग आहोत, आम्हाला बसच्या प्रवासभाड्यात ७५ टक्के सवलत आहे, असा गाजावाजा करीत बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर अनेकजण आजही शासनाला चुना लावण्याचे काम करीत आहेत. यावर कारवाया करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने आणखीनच अभय मिळत आहे. लोकमत प्रतिनिधीने मिळविलेल्या बनावट पासवर गुरूवारी प्रवास केला़ असा प्रवास अनेक जण करीत असून, एसटीला हजारोंचा चुना लागत आहे़
बहूजन हिताय, बहूजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी आजही लालपरी दिवस रात्र धावत आहे. सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी, अपंग, महिला, पुरूष, नोकरदार, लोक प्रतिनिधी यांना प्रवास भाड्यात सवलत देत आरक्षित जागा बसमध्ये देण्यात आलेली आहे. महामंडळाच्या बसमध्ये अपंग प्रवाशांसाठी प्रवास भाड्यामध्ये ७५ टक्के सवलत आहे. जे खरोखरच अपंग आहेत, त्यांना हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रूग्णालयापासून ते आगारप्रमुखांच्या कार्यालयापर्यंत उंबरे झिझवावे लागतात. आणि जे लोक अपंग नाहीत अशा लोकांनी ३०० ते ५०० रूपये दिले की, त्यांच्या हातात हे प्रमाणपत्र आणून दिले जाते़
अपवादात्मक कर्मचारी तत्पर
गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास बीड आगारातील विनाथांबा औरंगाबाद बसचे तिकीट घेतले. मात्र महामंडळातील काही वाहक प्रामाणिक असून येथील के.एम.क्षीरसागर नावाच्या वाहकाने हे प्रमाणपत्र जप्त करून आगारप्रमुख ए.एस.भूसारी व वरीष्ठ लिपीक आर.एन.राठोड यांच्याकडे दिले. यावरून काही कर्मचारी आजही तत्पर असल्याचे दिसून आले.
सहकार्याचाही अभाव
बनावट पास जप्त करून संबंधीत प्रवाशावर वाहक हा जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास जातो. मात्र पोलिसही याकडे दुर्लक्ष करतात व आरोपीची बाजू घेत आपले हितसंबंधी जोपासत असल्याचे एका वाहकाने ‘लोकमत’ला सांगितले.
कारवाया गुंतागुंतीच्या
‘आॅन द वे’ बनावट अपंगत्वाचे पासधारक वाहकांच्या निदर्शनास आले तरी यासंबंधी कारवाईची ‘प्रोसेस’ गुंतागुंतीची असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कारवाया दरम्यान बनावट पास जप्त केला जातो. पोलीस केस दाखल झाल्यानंतर न्यायालयात प्रकरण जाते. हे प्रकरण लवकर निकाली लागत नसून यामध्ये वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या ‘राड्या’त कोणीही पडत नसल्याचे समोर आले.
कारवाईचा बोजवारा
अपंगात्वाच्या बनावट सवलत पासचा सर्रास वापर केला जातो. मात्र त्यांच्यावरील कारवाया या दुर्मीळच असल्याचे सांगण्यात आले. यामुळेच दिवसेंदिवस कारवायाची चिंता न करता अपंगत्वाच्या बनावट सवलतींवर प्रवास करणाऱ्यांमध्ये वाढ होत आहे.
लोकमत प्रतिनिधीने एक एजंट गाठला़
४तो बनावट पास मिळवून देत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला पैशाचे अमिष दाखवले़
४अवघ्या ३०० रूपयांमध्ये त्याने चार दिवसात पास हातात ठेवला़
४या पाससाठी त्याने कुठलेही कागदपत्रांची मागणी केली नाही़ घेतला फक्त एक फोटो़
४जिल्हा समाज कल्याण अधिकारी, आगार व्यवस्थापक यांच्या स्वाक्षऱ्या व शिक्के असलेला पास त्याने मिळवून दिला़
अपंगत्वाचे बोगस पास मिळवून देणाऱ्याचे मोठे रॅकेट असून याला जिल्हा परीषद, समाजकल्याण आणि राज्य परीवहन महामंडळातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गल्लीबोळात क्षुल्लक रक्कम घेऊन बनावट बसची सवलत पास घरपोच आणून दिली जाते. ही पास मिळवण्यासाठी ‘वशिला’ लागत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. कारवाया थंडावल्याने दलाल मोकाट आहेत़