थोडे सबुरीने घ्या... आरक्षण मिळेलच
By Admin | Updated: June 2, 2016 23:46 IST2016-06-02T23:33:28+5:302016-06-02T23:46:17+5:30
औरंगाबाद : थोडे सबुरीने घ्या... आरक्षण मिळेलच! आणि ते टिकेलही, असे प्रतिपादन गृह, कृषी राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

थोडे सबुरीने घ्या... आरक्षण मिळेलच
औरंगाबाद : धनगर समाजाच्या आरक्षणाची अवस्था मुस्लिम आणि मराठा आरक्षणासारखी व्हायला नको, त्यामुळे थोडे सबुरीने घ्या... आरक्षण मिळेलच! आणि ते टिकेलही, असे प्रतिपादन गृह, कृषी राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त जयमल्हार सेनेच्या वतीने कोकणवाडीत आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राम शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. यावेळी आ. संजय शिरसाट, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, आ. अतुल सावे, नगरसेवक राजू शिंदे, सिद्धांत शिरसाट, दिलीप थोरात, पूनमचंद बमणे, बापू घडामोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गृहराज्यमंत्री शिंदे म्हणाले की, आरक्षणाची पूर्णत: चर्चा मुख्यमंत्री महोदयांसोबत झालेली आहे. अभ्यासकांचा अहवाल येऊ द्या, त्यावर आपल्यालाही मते मांडता येतील. अन्यथा मराठा व मुस्लिम आरक्षणासारखे होईल. त्यामुळे थोडं सबुरीने; परंतु भक्कम पुराव्यानिशी आरक्षण समाजाला मिळणारच आहे.
दऱ्याखोऱ्या, रानोमाळ भटकणाऱ्या समाजाच्या ६५ वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनात राहून समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आग्रही भूमिका आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, शेळी-मेंढीसाठीही समाजाला भरीव तरतूद देण्याचे काम केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पैठणगेट येथून मिरवणूक
दरम्यान, कार्यक्रमाच्या पूर्वी पैठणगेट येथून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. लिंबाजी चिंचोली येथील वाघ्या- मुरळी पथकाला पहिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर डफ वाद्यात पहिले बक्षीस आडगावला, तर दुसरे चित्तेपिंपळगाव आणि तिसरे बक्षीस आडूळच्या पथकाला देण्यात आले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, लहुजी शेवाळे यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्ता मेहेत्रे, अरुण रोडगे, प्रज्ञा काळे, लक्ष्मण काळे, किशोर डवणे, नारायण चाळगे, हौसाबाई काटकर यांनी परिश्रम घेतले.