आर्थिक दुर्बलांसाठी पुढाकार घ्या- चव्हाण
By Admin | Updated: July 14, 2014 01:02 IST2014-07-14T00:22:26+5:302014-07-14T01:02:51+5:30
नांदेड: मन्नेरवारलू समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले़

आर्थिक दुर्बलांसाठी पुढाकार घ्या- चव्हाण
नांदेड: मन्नेरवारलू समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले़
अखिल महाराष्ट्र मन्नेरवारलू संघटन, पुणे यांच्या वतीने रविवारी डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता़ यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी पालकमंत्री डी़ पी़ सावंत होते़ खा़ चव्हाण म्हणाले, मन्नेरवारलू समाजाच्या जात प्रमाणपत्रातील अडथळे दूर करण्यासाठी संघटितपणे लढा देवून शासनाला लवकर निर्णय घेण्यासाठी भाग पाडावे़ यासाठी न्यायालयात दाद मागावी़ एखाद्या समाजाला त्यांच्या न्याय्य मागण्यासंदर्भात उपेक्षित ठेवणे ही चुकीची भूमिका आहे़ खुल्या मनाने सामाजिक प्रश्न सोडविले पाहिजे़ मात्र तसे होत नाही़ मन्नेरवारलू समाजातील बांधवांना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मीसुद्धा या लढ्यात सहभागी असून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे़ मात्र समाजाने हा लढा इथेच थांबवू नये़ जे हक्काचे आहे ते मागणे चुकीचे नाही़ समाजाने शासन दरबारी आपले प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजे़
अडचणीवर मात करीत पालकांनी आपल्या मुलांना गुणवंत केले, याबद्दल कौतुक करत खा़ चव्हाण म्हणाले, जात प्रमाणपत्राचा प्रश्न समोर असताना पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले़ चांगल्या पदावर जाण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यात येत आहे़ ही चांगली गोष्ट आहे़ सोबतच समाजातील गरीब कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागणार आहे़ सन २०११ पासून जात वैधता प्रमाणपत्र देणे बंद झाले असून त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले़ तर सुरेश अंबुलगेकर यांनी कोलाम व मन्नेरवारलू या दोन जाती भिन्न असून त्यांच्या रूढी- पंरपरा वेगळ्या असल्याचे सांगितले़ मुन्नेरवारलू समाजाचे ८ हजार जातवैधता प्रमाणपत्र औरंगाबाद विभागाकडे प्रलंबित असल्याचेही ते म्हणाले़
कार्यक्रमास आ़ ओमप्रकाश पोकर्णा, आ़ अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जि़ प़ समाजकल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर, सुरेश अंबुलगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ पांडुरंग पुदलवाड, साहेबराव दबडे, दिलीप बास्टेवाड, मधुकर उन्हाळे, साहेबराव बागेलवाड, नगरसेवक श्रीनिवास सातेलीकर, संजय इंगेवाड, डॉ़ रविकुमार चटलावार, पोतन्ना लखमावार, गोविंद पडलवार, शिवाजी इसलवार, गंगाधर सायनोड, सरस्वती नागमवाड, श्रीमती गंगामणी अबलकवाड आदी उपस्थित होते़
सूत्रसंचालन यलप्पा कोलेवाड यांनी केले़ (प्रतिनिधी)