परीक्षेचे गोपनीय साहित्य जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST2021-05-13T04:04:11+5:302021-05-13T04:04:11+5:30
--- औरंगाबाद : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. अगोदर नियोजित वेळापत्रकानुसार तयारीवेळी ...

परीक्षेचे गोपनीय साहित्य जपा
---
औरंगाबाद : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. अगोदर नियोजित वेळापत्रकानुसार तयारीवेळी औरंगाबाद वगळता इतर विभागीय परीक्षा मंडळांनी गोपनीय साहित्याचे वाटप परीक्षा केंद्रांना केले होते. ते परीक्षेचे गोपनीय साहित्य जपून ठेवा, अशा सूचना राज्य मंडळाने विभागीय परीक्षा मंडळांना दिल्या आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी विभागीय मंडळाचे सचिव डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.
शिक्षण विभागाकडून दहावीचे अंतर्गत मूल्यांकन आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण मंगळवार रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आले. त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली नसली तरी ४५ टक्क्यांहून अधिक जणांनी यात मते नोंदवली आहेत. त्यासंदर्भात पुढील निर्णय होईल. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये प्रस्तावित होती. त्यातील दहावीची परीक्षा रद्द झाली तर बारावी परीक्षेचे वेळापत्रक हे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन परिस्थिती नियंत्रणात असेल याची खात्री झाल्यावर त्याच वेळी जाहीर होण्याची शक्यता उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, सचिव अशोक भोसले यांनी विभागीय मंडळांसह केंद्रांवर वाटप झालेले परीक्षेचे गोपनीय साहित्य जपून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर औरंगाबाद विभागाकडून साहित्य वाटप न करण्यात आल्याने बोर्डाकडे असलेले साहित्य नीट जपण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे डॉ. चव्हाण म्हणाले. दहावी मूल्यमापन आणि बारावी परीक्षेसंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.