ले दारू..पी दारू..!
By Admin | Updated: December 31, 2014 01:02 IST2014-12-31T00:56:10+5:302014-12-31T01:02:52+5:30
लातूर : नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा अलीकडच्या काळात बदललेली आहे़ दर वर्षी मद्यपान आणि नॉनव्हेजच्या पार्ट्या करुन नववर्षाचा आनंद साजरा

ले दारू..पी दारू..!
लातूर : नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा अलीकडच्या काळात बदललेली आहे़ दर वर्षी मद्यपान आणि नॉनव्हेजच्या पार्ट्या करुन नववर्षाचा आनंद साजरा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ शहरासह ग्रामीण भागातही हॅपी न्यू ईअरचे फॅड वाढत असल्याने, मदिरालये, हॉटेल, धाबे आदी ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे़ त्याच अनुषंगाने लातूर शहरातील हॉटेल, बिअरबार, बिअर शॉपी सजल्या आहेत़ विद्युत रोषणाई व ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी हॉटेल चालकांनी जाहिरातबाजीही सुरु केली आहे़ मद्यपींची सोय व्हावी म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्पुरते परवानेही दिले आहेत़ गेल्या दोन दिवसात १६ हजार दारु पिण्याच्या परवान्यांचे वाटप केले असून, उद्या ५ वाजेपर्यंत आणखीन १५ हजार दारु पिण्याचे परवाने वाटप केले जाण्याची शक्यता आहे़ तर दुसरीकडे अंनिसने मद्यमुक्तीची हाक देऊन शहरात शोभायात्रेचे आयोजन केले आहे. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. माधव बावगे यांनी ‘चला व्यसनाला बदनाम करुया’ हे ब्रिद घेऊन शहरात व्यसनमुक्तीविरोधात मोहीम उघडली आहे.
गतवर्षी राज्य शासनाने पहाटे ५ वाजेपर्यंत बिअरबार व हॉटेल चालकांना परवानगी दिली होती़ यंदाही तसाच नियम आहे़ परंतु स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, रात्री १ वाजेपर्यंत मदिरालये चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे़ रात्री १ नंतर सर्व बिअरबार व हॉटेल बंद ठेवावेत, असे सक्त निर्देश यंदा देण्यात आले आहेत़ त्यानुसार लातूर जिल्ह्यातील देशी दारुचे ९०, बार ४२५, बिअरशॉपी १५० अशी मदिरालये रात्री १ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. या सर्व मदिरालयाने जय्यत तयारी केली असून, विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहेत़ इकडे उत्पादन शुल्क विभागाने परवान्याची मोहीम सुरुच ठेवली असून, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवाने दिले जाणार आहेत़ जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री १ वाजेपर्यंतच परवानगी दिल्याने पोलिस प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला असून, रात्री रस्त्यावर मद्यपींचा गोंधळ होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला आहे़ त्यासाठी गस्त पथके नेमण्यात आली असून, गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे़ मद्यपान करुन वहान चालविणाऱ्यावरही कारवाई केली जाणार आहे़
शहर वहातून शाखेच्या वतीने बे्रथ अनालायझर द्वारे तपासणी केली जाणार आहे़ २०० पोलिस कर्मचारी यासाठी तैनात केले असून, जिल्हा पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुचना केल्या आहेत़
दरवर्षी होणारी विक्री पाहून बिअरबार व हॉटेलचालकांनी पूर्वीच साठा करुन ठेवला असून, नॉनव्हेज व व्हिजेटीरीयनचे खास मेनुची तयारी केली आहे़
यंदा ५ वाजेपर्यंत परवानगी नसल्यामुळे लवकरच बारमध्ये गर्दी दिसणार आहे़ त्यानुसार चालकांनी ग्राहकांसाठी आसन व्यवस्थाही सजविली आहे़ गतवर्षी पहाटेपर्यंत परवानगी दिल्याने मोठा विरोध त्याला झाला होता़ परंतु यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात १ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे़ ४
लातूर जिल्ह्यातील ९० देशी दारूच्या दुकानांतून १५ हजार लिटर्स देशी दारू ४५० बारमधून ४५ हजार ५०० लिटर्स विदेशी दारू आणि १५० बिअर शॉपीमधून १५ हजार लिटर्स बिअर ३१ डिसेंबरला रिचविली जाईल, असा अंदाज आहे. हा अंदाज गतवर्षीच्या अनुभवावरून वर्तविण्यात आला आहे. तर गतवर्षीच्याच अंदाजानुसार ५ टन मटण बिअरबार, ढाबे, हॉटेल्स, खानावळींतून जाईल, असाही अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
लातूर : व्यसनाचे प्रमाण वाढत आहे़ तरुण मुलांत त्याचे प्रमाण अधिक असून, ही धोक्याची घंटा आहे़ बुद्धीवर घाला घाणाऱ्या या व्यसनाला आता बदनाम केले पाहिजे़ सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना तरुणाईने असा पण करावा, असा उपदेश अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़
माधव बावगे म्हणाले, आनंद व्यक्त करताना पार्ट्या केल्या जातात़ दारु रिचविली जाते़ या पार्ट्यांमुळे न कळत व्यसन जडते़ व्यसनामुळे माणूस आतून पोखरला जातो़ मतीबधीर व गुंगी आणणारे हे व्यसन कधी जीव घेईल, हे कळतही नाही़ आनंदाच्या पार्ट्या केल्याने १५ टक्के लोकांना व्यसनाधीनता येते़ हे व्यसन दिर्घ काळ टिकून राहते़ आता तर पार्ट्या हे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे़ त्यामुळे तरुणाई यात ओढली जात आहे़ न दारु पिणारा दाखवा अन् हजार मिळवा अशी म्हणण्याची वेळ येत आहे़ एकदा व्यसन जडले की, ते मारहाण करुन सुटत नाही़ त्यासाठी समुपदेशन करुन मतपरीवर्तन करावे लागते़ या व्यसनाधीनतेकडे शासन गांभीर्याने पाहत नाही़ दारु विक्रीचे परवाने राजरोसपणे दिले जातात़ उत्पादनही केले जाते़ मात्र त्यावर बंदी घातली जात नाही़
दारु विक्रीतून व उत्पादनातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो़ त्यामुळेच शासन यावर उपाय करीत नाही़ १९९२-९३ सालात २५० कोटीचा महसूल राज्य शासनाला मिळाला होता़ तर २०१२-१३ मध्ये ८ हजार ९०० कोटींचा महसूल मिळाला आहे़ एवढा मोठा महसूल दारुमधून राज्य शासनाला मिळत असल्यामुळे त्यावर बंदी घातली जात नाही़ जेवढा महसूल मिळतो़ त्याच्या तिप्पट पिणाऱ्याच्या खिशातून जातात़ यामुळे नितीमुल्ये, समाजातील पत, प्रतिष्ठा, शारिरीक हाणी, कुटुंबाची हाणी होते़ आता तर धान्यापासून दारु निर्माण करण्याचे कारखाने उभारले जात आहेत़
हा व्यसनाधीनता वाढविण्याचाच प्रकार आहे़ आनंद व्यक्त करताना दारुच प्यावी लागते का, असा सवाल करत बावगे म्हणाले, जो पैसा पार्ट्यांवर खर्च होणार आहे़ तो पैसा विधायक कामासाठी वापरला तर समाजाचे सामाजीक आरोग्यही सुदृढ होईल़