नवे अप्रशिक्षित कर्मचारी घेण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्या
By Admin | Updated: November 19, 2014 01:00 IST2014-11-19T00:36:39+5:302014-11-19T01:00:25+5:30
औरंगाबाद : जीटीएल कंपनी नफ्यात होती. महिन्याला वीज बिलाच्या माध्यमातून ११० कोटी रुपये मिळत होते. महावितरण आणि जीटीएलच्या अर्थकारणाच्या वादात

नवे अप्रशिक्षित कर्मचारी घेण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्या
औरंगाबाद : जीटीएल कंपनी नफ्यात होती. महिन्याला वीज बिलाच्या माध्यमातून ११० कोटी रुपये मिळत होते. महावितरण आणि जीटीएलच्या अर्थकारणाच्या वादात १,०३२ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. महावितरण कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करून घेणार आहे. त्यांना कंत्राट देण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्यावे, अशी मागणी जीटीएल कर्मचारी कृती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
समितीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कंपनीने आम्हाला नोटीस दिली नाही. कंपनीत रुजू होताना १५ वर्षे नोकरी राहील, असे सांगितले होते. कंपनी महिन्याला ११० कोटी रुपये वीज बिलापोटी वसूल करीत होती.
महावितरणकडे आठ ते नऊ महिने कंपनीने पैसे भरले नाहीत. त्यावेळी महावितरणचे अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न समितीने उपस्थित केला. आमच्याकडे पात्रता आणि कामाचा अनुभव आहे. महावितरणने खाजगी कंत्राटदाराकडून अप्रशिक्षित कर्मचारी घेण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्यावे. आम्हाला शहराची पूर्ण माहिती आहे. त्याचा फायदा ग्राहकांना सेवा देताना होईल, असे समितीने सांगितले. महावितरणने सेवेत न घेतल्यास लवकरच कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला. यावेळी विजय पुरी, गजानन ढासलेकर, सतीश करपे, अरुण घागरे, प्रशांत सिरसाठ आदी कर्मचारी उपस्थित होते.
वाळूज एमआयडीसी परिसरातून एक महिन्याच्या वीज बिलापोटी ५५ ते ६० कोटी रुपये आम्ही वसूल करीत होतो. त्यामुळे कंपनी तोट्यात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असा दावा कर्मचाऱ्यांनी केला.
मुंबईतून धमकीचे फोन
४कंपनीकडे दोन दिवसांत राजीनामा लिहून द्या. जे काही मिळतील ते पैसे घ्या; अन्यथा काहीच मिळणार नाही, असे मुंबईतून फोन येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
कंपनीने ३० ते ४० कर्मचाऱ्यांना चेक दिले आहेत; पण ते कशाचे पैसे आहेत, हे सांगितले जात नाही. कंपनीचे अधिकारी चेक देताना राजीनामा आणि इतर काही पत्रांवर स्वाक्षऱ्या घेत आहेत. चेक दिले; पण ते होल्डवर ठेवले आहेत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.