कारवाई करा, अन्यथा न्यायालयात दाद मागू
By Admin | Updated: May 29, 2014 00:30 IST2014-05-29T00:27:59+5:302014-05-29T00:30:19+5:30
उस्मानाबाद : पोलिस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्या उपस्थितीत रिंगण करून ग्रामस्थांवर अत्याचार करण्यात आले.

कारवाई करा, अन्यथा न्यायालयात दाद मागू
उस्मानाबाद : पोलिस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्या उपस्थितीत रिंगण करून ग्रामस्थांवर अत्याचार करण्यात आले. हा प्रकार संतापजनक..तितकाच निंदनीय आहे. या वरिष्ठ अधिकार्यांसह दोषी कर्मचार्यांवर कठोर कारवाई करावी. केवळ बदली, बडतर्फी करून चालणार नाही तर या अधिकार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आपण न्यायालयात दाद मागू असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी दिला. पोलिस महासंचालकांनी केलेली चौकशी आम्हाला मान्य नाही. पोलिस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप आहेत. त्यांना सोबत घेऊन महासंचालक कशी काय चौकशी करू शकतात. हा प्रकार धूळफेक असल्याचे सांगत, दारूबंदीची मागणी करणार्या महिला ग्रामस्थांना एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे पोलिसांनी कोंबीग आॅपरेशन करून मारहाण केली आहे. यावेळी डीवायएसपी कडूकर यांनी शिवीगाळही केल्याचे सांगत, हा प्रकार अधिकार्यांना शोभणारा नसल्याचे ते म्हणाले. संपूर्ण राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आज गंभीर बनला आहे. महिला, दलित असुरक्षित आहेत. आता ग्रामस्थांची सुरक्षाही धोक्यात आल्याचे कनगरा प्रकरणावरून दिसून येते, अशा वेळी गृहमंत्री आर. आर. पाटील गप्प का? असा सवाल करीत शासनाने या प्रकरणी ग्रामस्थांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही तावडे यांनी केली. प्रकरणाची न्यायालयीन चौकशीच झाली पाहिजे, असा आमचा आग्रह असून, यासाठी येणार्या अधिवेशनात सभागृहाच्या दोन्ही सदनाचे काम आम्ही बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु महाराजांच्या महाराष्टÑाला काळीमा फासणारी ही घटना असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. मिलींद पाटील, जि. प. सदस्य कैलास शिंदे, दत्ता कुलकर्णी, संजय निंबाळकर, सुधीर पाटील, धनंजय शिंगाडे यांच्यासह आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी) ....या आहेत मागण्या कनगरा एकटे नाही, उभा महाराष्टÑ या ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याचे सांगत, सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, जखमीवर शासकीय खर्चाने उपचार करावेत, ज्यांना गंभीर व कायमस्वरुपी इजा पोहोचली आहे, अशा ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाची सोय करावी. पोलिसी अत्याचारात घराचे तसेच संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई द्यावी, आणि दोषी अधिकारी-कर्मचार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्या तावडे यांनी यावेळी केल्या. अटकेतील तिघांची होणार सुटका तीन ग्रामस्थ अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहेत. या तिघांचीही तातडीने सुटका करावी, अशी मागणी आपण गृहविभागाकडे केली असून, याबाबत लवकरच कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकार्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवावा, अशी सूचना केली असून, तसा अहवाल तातडीने देणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितल्याची माहितीही तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाने योग्य कारवाई न केल्यास पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा शब्दही तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.