मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार
By Admin | Updated: July 3, 2017 00:34 IST2017-07-03T00:29:21+5:302017-07-03T00:34:54+5:30
नांदेड : पावसाळ्यात साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून आरोग्य विषयक सेवा द्यावी़

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पावसाळ्यात साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून आरोग्य विषयक सेवा द्यावी़ जे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहून सेवा देणार नाहीत, अशांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिला़
मान्सून कालावधी हा अनेक आजारांसाठी संवेदनशील कालावधी असल्याने या काळात विविध जलजन्य जसे कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, विषमज्वर, कावीळ तसेच किटकजन्य आजार यात हिवताप, डेंगीताप इत्यादी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते़ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या मुख्यालयी राहून जनतेस आरोग्य विषयक सेवा पुरविण्याच्या व पावसाळ्याच्या काळात विशेष दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे यांनी दिल्या आहेत़ प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून आरोग्य विषयक सेवा देणार नाहीत, अशांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे़ दरम्यान, जिल्ह्यात मुख्यालयी न राहून सेवा न देणाऱ्या बिलोली तालुक्यातील आरोग्य सेविकेस मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे यांनी निलंबित केले़
पावसाळ्यात साथरोगास प्रतिबंध करण्यासाठी व जनतेचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधीसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे़ तसेच ग्रामपंचायतीमध्ये पुरेसा टीसीएल साठा उपलब्ध ठेवून टीसीएलद्वारे पाणी शुद्धीकरणानंतरच पाणीपुरवठा करण्याच्या सूचना सर्व संबधितांना देण्यात आल्या आहेत़ साथरोगाची लागण आढळून आल्यास तत्काळ उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना दिल्या आहेत़ साथीच्या अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरावर साथ नियंत्रण पथके स्थापन करण्यात आले आहेत़
जिल्हास्तरीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दोन भरारी पथके स्थापन करण्यात आले असून या पथकामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन साथ विषयक उपाययोजना, मुख्यालयी वास्तव व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमांची पाहणी व आढावा घेण्यात येणार आहे़
दरम्यान, पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेन काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य व शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे यांनी केले आहे़