तहसीलदारांना धारेवर धरले
By Admin | Updated: February 27, 2016 00:13 IST2016-02-27T00:05:39+5:302016-02-27T00:13:14+5:30
कुरूंदा : वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी गुरूवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात आल्या असता संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरून स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.

तहसीलदारांना धारेवर धरले
कुरूंदा : येथे निराधार योजनेतील मंजूर लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी गुरूवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात आल्या असता संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरून स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. तब्बल एक तास हा गोंधळ सुरू होता.
कुरूंदा येथे निराधार योजनेतील लाभार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुरूंदा सर्कलअंतर्गत २४ लाभार्थ्यांची निराधार योजनेमध्ये अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी कुरूंद्यात तहसीलदारांची बैठक आयोजित होती. ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार सुरेखा नांदे आल्या असता संतप्त ग्रामस्थ व महिलांनी स्वस्त धान्य मिळत नसून, तक्रारी करूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. कुरूंद्यात स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार करून लाभार्थ्यांशी आरेरावी करतात, वेळेवर माल वाटप करीत नाहीत, कमी प्रमाणात माल देतात अशा तक्रारी करण्यात आल्या. यावेळी स्वस्त धान्य प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश मंडळ अधिकाऱ्याला तहसीलदार सुरेखा नांदे यांनी दिले. बैठकीस सरपंच रेखाताई इंगोले, मंडळ अधिकारी अंभोरे, तलाठी आर. डी. राऊत, चंद्रकांत दळवी, दत्तराव इंगोले, शेख फारूख हवालदार, विश्वनाथराव दळवी, बाबुराव शेवाळकर आदींची उपस्थिती होती. या गोंधळामध्ये दारूबंदीचाही प्रश्न महिलांनी आक्रमकपणे मांडला. (वार्ताहर)