तहसील, तलाठी सज्जांना टाळे; शेतकरी संपाचा सहावा दिवस

By Admin | Updated: June 7, 2017 00:22 IST2017-06-07T00:21:00+5:302017-06-07T00:22:06+5:30

बीड : संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत सहा दिवसांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप सुरूच आहे

Tahsil, Talathi Ready; Sixth day of farmers' strike | तहसील, तलाठी सज्जांना टाळे; शेतकरी संपाचा सहावा दिवस

तहसील, तलाठी सज्जांना टाळे; शेतकरी संपाचा सहावा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत सहा दिवसांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप सुरूच आहे. मंगळवारी ठिकठिकाणी आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. अनेक गावातील तलाठी सज्जांना संतप्त शेतकऱ्यांनी कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. काही ठिकाणी दूध व भाजीपाला रस्त्यावर फेकण्याचेही प्रकार घडले. काही गावांतील आठवडी बाजार भरले नाहीत. दरम्यान सहाव्या दिवशी आंदोलनास संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव, धारूर, परळी, वडवणी, अंबाजोगाई , केज इ. तालुक्यांतील अनेक गावांत तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले.
अंबेवडगावचा आठवडी बाजार बंद
धारूर तालुक्यातील अंबेवडगाव व परिसरातील गावातील शेतकरी संपात सहभागी झाले. अंबेवडगाव येथील मंगळवारी भरणारा आठवडी बाजार ही बंद ठेवण्यात आला.
किसान सभा व शेतकरी यांनी मंगळवारी भरणारा अंबेवडगाव येथील आठवडी बाजार न भरवण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला शेतकऱ्यांनी येथेच फेकून दिला.
पाचेगाव तलाठी सज्जास कुलूप
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले तर गेवराई तहसील कार्यालयास कुलूप ठोकण्याचा प्रयत्न झाला. ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिर तसेच पारावर बैठका घेऊन संपाबाबत विचारविनिमय केला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
अंबाजोगाईत निदर्शने
शेतकऱ्यांचा संप विविध मार्गाने सुरू ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.
यावेळी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट, हनुमंत चाटे, मनोज इंगळे, सौरभ संगेवार, प्रशांत आदनाक, कॉ. बब्रुवान पोटभरे, सुहास चंदनशिव, योगेश कडबाने, गंगाधर ढोणे, वाजेद खतीब, अ‍ॅड. प्रशांत शिंदे, राणा चव्हाण, श्रीधर गरड, भरत जाधव, सुशांत यादव, राहुल कापसे, अर्जुन जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परळीत निदर्शने
किसान क्र ांती मोर्चाच्या वतीने परळी तहसील समोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पी. एस. घाडगे, राजेश देशमुख, पांडुरंग राठोड, उत्तम माने, शिवाजी देशमुख, अजय बुरांडे, सुदाम शिंदे, हमाल युनियनचे गंगाधर पोटभरे, ज्ञानेश्वर मुंडे, दीपक गिते, रूपेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.
किसानपुत्रांचे आंदोलन
जिल्ह्यातील सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर किसानपुत्रांच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉ. मोहन जाधव म्हणाले.

Web Title: Tahsil, Talathi Ready; Sixth day of farmers' strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.