डावपेच, कुरघोडी अन् गोंधळ...!

By Admin | Updated: January 10, 2017 23:54 IST2017-01-10T23:54:04+5:302017-01-10T23:54:49+5:30

बीड : येथील पालिकेत मंगळवारी बोलाविलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत काका-पुतण्यांमधील वर्चस्वाची लढाई दिसून आली.

Tactics, turmoil and confusion ...! | डावपेच, कुरघोडी अन् गोंधळ...!

डावपेच, कुरघोडी अन् गोंधळ...!

बीड : येथील पालिकेत मंगळवारी बोलाविलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत काका-पुतण्यांमधील वर्चस्वाची लढाई दिसून आली. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर पालिकेत येण्यापूर्वीच आजारी पडले. त्यानंतर जि.प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सभा होण्यासाठी तोडगा काढण्याची विनंती केली. तिकडे एमआयएमने जारी केलेला व्हिप स्वतंत्र गटाच्या सात नगरसेवकांनी नाकारला. पेचप्रसंग निर्माण झाल्याने प्रशाासनाने चेंडू नगरविकास विभागाच्या कोर्टात ढकलला. डावपेच, कुरघोडी व गोंधळात सर्वसाधारण सभा अखेर झालीच नाही.
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली. त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीचे सर्वाधिक २० नगरसेवक पालिकेत निवडून आले. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी अपेक्षित संख्याबळ नसल्याने त्यांनी एमआयएमच्या ७ सदस्यांच्या स्वतंत्र गटाची मदत घेतली. मंगळवारी उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सव्वाबारा वाजता पालिका सभागृहात बैठक बोलावली होती. त्यासाठी सर्वच पक्ष व आघाडीचे नगरसेवक पालिकेत दाखल झाले. मात्र, सव्वाअकरा वाजताच डॉ. क्षीरसागर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. ही वार्ता सोशल मीडियावरून सर्वत्र पसरली. त्यानंतर पालिका व दवाखान्यात कार्यकर्त्यांची गर्दी झाली.
दरम्यान, नगराध्यक्ष हे पीठासीन अधिकारी असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सभा घेणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांच्यासमोर पेच निर्माण झाला. त्यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. इकडे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांच्या प्रतीक्षेत सभागृहात बसून होते. काही वेळानंतर डॉ. क्षीरसागर यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलविल्याचे वृत्त धडकले. त्यानंतर बैठक होणार नाही, असे चित्र निर्माण झाले.
जि.प. सभापती संदीप क्षीरसागर हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. मात्र, नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत बैठक घेणे उचित होणार नाही, असा निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शेवटी निवडणूक विभागातील प्रशासन प्रमुख सतीश शिवणीकर यांनी सभागृहात जाऊन सभा होणार नसल्याचे घोषित केले. त्यानंतर ताटकळलेल्या नगरसेवकांनी सभागृह सोडले. (प्रतिनिधी)
संदीप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा

४दुपारी विविध पक्षांच्या नगरसेवकांचे जथ्थे पालिकेकडे जात होते. एमआयएमचे नगरसेवक शेख अमर शेख जैनोद्दीन व नगरसेविका रुक्सानाबी जकियोद्दीन हे दोघे जीप (क्र. एमएच-२३ क्यू-१३१३) मधून पालिकेकडे
येते होते.
४जि.प.च्या बांधकाम विभागासमोरुन सभापती संदीप क्षीरसागर व काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांचा ताफा देखील पालिकेकडे जाण्यास निघाला होता. शेख अमर यांचा जीपचालक शेख इरफान यांनी गाडी थांबवली.
४त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या ताफ्यातील गाड्याही थांबल्या. यावेळी संदीप क्षीरसागर व शेख बिलाल यांनी चालक शेख इरफान याच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे गोंधळ उडून तणावपूर्ण स्थिती बनली.
४शेख अमर यांनी शहर ठाण्यात संदीप क्षीरसागर, शेख बिलाल, शेख सिद्दीक या तिघांवरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: Tactics, turmoil and confusion ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.