छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शेतकरी कर्जबाजारामुळे आत्महत्या करीत आहेत दुसरीकडे मात्र जनतेने निवडून दिलेल्या आमदार विधीमंडळात ठोसे मारतात, मंत्री रमी खेळतात ही लाजिरवाणी बाब आहे. अशा लोकप्रतिनिधीं विरोधात छावाने शनिवारी सकाळी क्रांतीचौकात प्रतिकात्मक रमी आणि बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करुन सरकारचा निषेध नोंदविला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे,मंत्री कोकाटेचे करायचे काय खाली मुंडकं वर पाय, राज्यसरकार हाय, हाय अशा घोषणा वेळी आंदोलकांनी दिल्या.
विधीमंडळात मंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाइन रमी खेळत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आमदार संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला ठोसे मारले. तर आमदार गोपीचंद पडळकर आणि आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारामारी केली. या सर्व घटना लोकशाहीच्या पवित्र सभागृहात झाल्या. याघटनेविरोधात छावा संघटनेने शनिवारी क्रांतीचौकात प्रतिकात्मक रमी खेळून आणि बॉक्सिंगचे ठोसे मारो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूला शेतकऱ्याच्या आसूडाचे फटके बक्षीस देण्यात आले.
या वेळी आंदोलकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, मंत्री कोकाटेचे करायचे काय खाली मुंडकं वर पाय, राज्यसरकार हाय, हाय, गोपीचंद पडळकर हाय, हाय आदी घोषणा दिल्याने क्रांतीचौक परिसर दणाणला. या आंदोलनात प्रा. चंद्रकांत भराट, अशोक मोरे, राजीव थिटे, विजय काकडे, नितीन कदम, निवृत्ती डक, जयाजी सूर्यवंशी, आत्माराम शिंदे, नाना पळसकर, प्रा.गोपाल चव्हाण यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.