अविश्वासाची तलवार म्यान
By Admin | Updated: November 18, 2014 01:08 IST2014-11-18T00:58:27+5:302014-11-18T01:08:35+5:30
औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्या विरोधात अविश्वास आणण्यासाठी उपसण्यात आलेली सत्ताधारी, विरोधकांची तलवार म्यान झाली आहे.

अविश्वासाची तलवार म्यान
औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्या विरोधात अविश्वास आणण्यासाठी उपसण्यात आलेली सत्ताधारी, विरोधकांची तलवार म्यान झाली आहे. आयुक्तांनी लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडील धनादेश लिहिण्याचे अधिकार काढून ते मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांच्याकडे दिले आहेत.
यासोबतच महावीर पाटणी यांच्याकडे प्रशासकीय अधिकारीपदाचा पदभार देण्यात आला आहे. तसेच अय्युबखान यांच्याकडे आस्थापना अधिकारी-१ या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडील पदभार काढण्याचे आदेश महापौरांनी दिले. १३ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पवारांच्या चहापानावरून सेटलमेंटची चर्चा रंगली. १४ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसोबत महापौर, विरोधी पक्षनेत्यांमध्ये पवार यांच्यात पदभार काढण्यावरून बाचाबाची झाली होती. तसेच माजी आ. जैस्वाल यांनी आयुक्तांना लेखाधिकारी पवार यांचा पदभार काढण्यासाठी पत्र दिले होते. १५ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत विकासकामांच्या संचिका, लेखा विभागातील पदावनतीवरून चर्चा झाली होती.
तारेवरची कसरत : बजेट
आले ५० टक्क्यांवर
मनपाला आगामी काळात तारेवरची कसरत करून खर्च भागवावा लागणार आहे. मनपाला सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न ४०० कोटींच्या आसपास जाणार आहे. यंदाचे बजेट ८०० कोटींचे आहे. शासनाकडून १०० कोटींचे अनुदान मिळाले, तर परिस्थिती सुधारेल; अन्यथा नाही, असा दावा सूत्रांनी केला. २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे या सभेचे हे अंतिम बजेट ठरणार आहे. शिल्लक कामांमुळे आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे.
४५ कोटींचे रस्ते, ४६४ कोटींची भुयारी गटार योजना, समांतरसाठी दरमहा साडेपाच कोटी रुपये, पथदिव्यांसाठी मनपाला प्राधान्यक्रम देऊन खर्च करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त २०१२-१३ च्या अर्थसंकल्पातील १०० कोटींच्या शिल्लक कामांचा निपटारा अजून झालेला नाही. त्यातच २०१३-१४ च्या अर्थसंकल्पातील १०० कोटी रुपयांची कामे शिल्लक आहेत.
२०१४ या वर्षात लोकसभा, विधानसभा, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ या निवडणूक झाल्या. ५ महिने निवडणूक आचारसंहितेत गेले. ७ महिने पालिका पदाधिकाऱ्यांना विकासकामांसाठी होते. त्यातून साडेचार महिने संपले आहेत. एप्रिल २०१५ मध्ये मनपा निवडणुका आहेत. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांचा कामे होत नसल्यामुळे तिळपापड होतो आहे.