महावितरणमध्ये बदल्यांचे सत्र सुरू
By Admin | Updated: November 14, 2014 00:57 IST2014-11-14T00:49:16+5:302014-11-14T00:57:17+5:30
औरंगाबाद : साडेतीन वर्षांपूर्वी शहरातील वीज वितरित करण्याची जीटीएलला दिलेली जबाबदारी महावितरण पुन्हा घेण्याची तयारी करीत आहे.

महावितरणमध्ये बदल्यांचे सत्र सुरू
औरंगाबाद : साडेतीन वर्षांपूर्वी शहरातील वीज वितरित करण्याची जीटीएलला दिलेली जबाबदारी महावितरण पुन्हा घेण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची जमवाजमव सुरू आहे. जीटीएल हस्तांतराच्या निमित्ताने महावितरणमध्ये सध्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.
महावितरणचे वीज बिलापोटी ३९३ कोटी जीटीएलने थकविल्यामुळे कंपनीला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस दिलेली आहे. नोटीस दिल्यानंतरही जीटीएलकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. १६ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपासून महावितरण ताबा घेणार आहे. त्यासाठी महावितरणकडून औरंगाबाद आणि जालना विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची शहारात बदली करण्यासाठी अंतर्गत कारवाई सुरू आहे. जवळपास चारशे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही कर्मचारी आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून घेण्याचे नियोजन सुरू आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचे औरंगाबादमध्ये बदलीचे विनंती अर्ज आलेले आहेत. त्यांना प्रथम प्रधान्य देऊन बदली करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जे कर्मचारी शहरात येण्यासाठी उत्सुक आहेत. त्या कर्मचाऱ्यांनी अधिकारी आणि विविध संघटनांच्या नेत्यांच्या माध्यमातून लॉबिंग सुरू केली आहे. बदल्यांचा हंगाम नसताना महावितरणमध्ये बदल्यांचे वारे जोरात वाहत आहे.
शहरात जीटीएलचे १ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. सोमवारपासून महावितरण वीज पुरवठा ताब्यात घेणार आहे.