बदल्यांची लगीनघाई

By Admin | Updated: June 8, 2014 00:57 IST2014-06-08T00:52:08+5:302014-06-08T00:57:50+5:30

जालना : जिल्हा प्रशासनात तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले असून अन्य काही अधिकारीही बदलीसाठी इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Swings of transfers | बदल्यांची लगीनघाई

बदल्यांची लगीनघाई

जालना : जिल्हा प्रशासनात तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले असून अन्य काही अधिकारीही बदलीसाठी इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मे आणि जून महिना म्हटले की, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची लगीनघाई असते. जिल्हा महसूल प्रशासनातील ७८ कर्मचाऱ्यांच्या बदलीची यादी नुकतीच जाहीर झाली. आणखी दुसरी यादीही तयार करण्याचे काम सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता असली तरी त्याचा या बदल्यांवर काही परिणाम नसल्याचेही सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकाऱ्यांपैकी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्या कार्यकाळास २ जून रोजी तीन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीची शक्यता वर्तविली जात आहे. तर उपविभागीय अधिकारी म्हणून भोकरदन येथे कार्यरत असलेले डॉ. एन.आर. शेळके हे औरंगाबाद येथे बदलीसाठी इच्छुक असल्याचे समजते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके हेही बदलीसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. जाफराबादच्या तहसीलदार सुमन मोरे यांच्याही बदलीची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय अन्य पदांवरील काही अधिकारीही बदल्यांसाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, महसूल कर्मचाऱ्यांच्या पहिल्या यादीत समावेश न झालेले बदलीसाठी इच्छुक असलेले कर्मचारीही बदलीसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.
जिल्हाधिकारी कार्यालयात काही पदांवरील अधिकारी येणाऱ्या तीन-चार महिन्यांच्या काळात सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर बदलून येण्यासाठी इतर जिल्ह्यातील अधिकारीही प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदावर मात्र अद्याप कुणाची नियुक्त झाली नाही. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून या पदावर येण्यासाठी काही अधिकारी इच्छुक आहेत.
बदल्यांसाठी इच्छुक अधिकारी मुंबईत तळ ठोकून असल्याचे समजते. आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. येत्या आठवडाभरात बदल्यांचे चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तविली. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत शिक्षकांची पदोन्नती सोमवारपासून
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्या यापूर्वी जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र शिक्षकांमधून मुख्याध्यापक पदाची पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अगोदर पदोन्नती प्रक्रिया घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात समुपदेशनाद्वारे पदोन्नती प्रक्रिया होणार आहे.
दुसरी यादी लवकरच तयार?
जिल्हा महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी यादी लवकरच तयार होणार असल्याचे कळते, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. काही तहसील कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारीही बदलीसाठी प्रयत्नशील असून वरिष्ठांकडे त्यांनी पाठपुरावा सुरू केल्याचे समजते.

Web Title: Swings of transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.