नृत्यातून आळवले ‘मधुर’ पसायदान!

By Admin | Updated: October 6, 2014 00:42 IST2014-10-06T00:18:27+5:302014-10-06T00:42:19+5:30

औरंगाबाद : देवमुद्रा फाऊंडेशनच्या ‘पसायदान’ या वार्षिक नृत्योत्सवात नृत्यांगनांनी देखणा कलाविष्कार घडविला.

'Sweet' pasadan taken from dance! | नृत्यातून आळवले ‘मधुर’ पसायदान!

नृत्यातून आळवले ‘मधुर’ पसायदान!

औरंगाबाद : आसमंती भरून उरलेला घुंगरांचा मधुर नाद... प्रसन्न रंगांची सालंकृत वेशभूषा... जिवंत मुद्राभिनय आणि खिळवून ठेवणारा चपळ पदन्यास... देवमुद्रा फाऊंडेशनच्या ‘पसायदान’ या वार्षिक नृत्योत्सवात नृत्यांगनांनी देखणा कलाविष्कार घडविला.
शास्त्रीय नृत्याच्या प्रचार-प्रसारासाठी गेल्या ७ वर्षांपासून कार्यरत ‘देवमुद्रा’ संस्थेच्या या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, संस्थेतील नृत्यशिक्षिका व्ही. सौम्यश्री, भाग्यश्री राजूरकर, सायली सराफ, सई घाडगे, तृप्ती पुरले, शीतल क्षत्रिय, बालकृष्ण वानखडे यांच्यासह रसिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमासाठी आर.डी. पवार यांनी नृत्यदिग्दर्शन केले. ज्येष्ठ बासरीवादक बाबूराव दुधगावकर यांनी बासरीच्या सुरावटीवर सादर केलेल्या गणेशवंदनेने मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक पसायदान सादर केले. कुचिपुडी प्रकारातील कालीस्तुतीमधून असुराचा वध करणाऱ्या तेजस्वी रणरागिणीचे रूप उपस्थितांना मुग्ध करून गेले. नंतर श्रीकृष्णाची अशी अनेक अवखळ रूपे नृत्यांगनांनी लीलया साकारली. ‘मधुराधिपती... अखिलम मधुरम’ या वल्लभाचार्यांनी रचलेल्या ‘मधुराष्टकम्’मधून हे प्रसंग सादर झाले. पं. रविशंकर यांच्या ‘भूमिमंगलम्’ रचनेने ‘वसुधैव कुटुंबकम्’चा उदात्त संदेश दिला. चिमुकल्या नृत्यांगनांनी घडविलेले हे वैश्विकतेचे दर्शन भरभरून दाद घेऊन गेले. यावेळी सर्व नृत्यांगनांना धानोरकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली. अलारिपू सादरीकरणासह शेवटी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीतावरच्या आविष्काराने मैफलीची सुरेल सांगता झाली.

Web Title: 'Sweet' pasadan taken from dance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.