‘स्वाभिमानी’चा मोर्चा
By Admin | Updated: May 22, 2015 00:32 IST2015-05-22T00:25:37+5:302015-05-22T00:32:12+5:30
भूम : दुधाला प्रतिलिटर ३० रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी मोर्चा, मोटार सायकल रॅली काढण्यात आली़

‘स्वाभिमानी’चा मोर्चा
भूम : दुधाला प्रतिलिटर ३० रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी मोर्चा, मोटार सायकल रॅली काढण्यात आली़ यावेळी गांधीगिरी करून शासकीय कर्मचाऱ्यांनाच दुधाचे वाटप करण्यात आले़
शेतकरी पशुखाद्य विकत घेऊन जनावरे जगवित आहेत़ मात्र, खर्चाच्या पटीत दुधाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी सकाळी जिजाऊ चौक, वाशी रोड येथून मोटार सायकल रॅली काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अरविंद बोळंगे यांना दिले़ शिवाय कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्ण करुन भूम, परंडा, वाशीला हक्काचे पाणी मिळावे, उजनी ते सीना-कोळेगाव प्रकल्पाचे काम पूर्ण करुन सीना-कोळेगाव धरणात पाणी सोडावे, शेतकऱ्यांच्या खोदलेल्या जमिनीचा मावेजा तात्काळ द्यावा, कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत भूम, परंडा, वाशी येथे झालेल्या कामांची चौकशी करावी व दोषींवर कार्यवाही करावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, युवा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मुंडे, उमेश नायकिंदे, शंकर गाढवे, भागवत साळुंके, भरत कदम, राहुल तांबारे, हनुमंत सुपेकर, दत्तात्रय कराळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)