शरणापूर रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:02 IST2021-02-07T04:02:07+5:302021-02-07T04:02:07+5:30
भारतीय किसान समन्वय समितीने पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दुपारी १२.३० वाजता शरणापूर ...

शरणापूर रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
भारतीय किसान समन्वय समितीने पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दुपारी १२.३० वाजता शरणापूर टी पॉइंटवर जमा झाले होते. प्रत्येकाच्या हातात फलक होते. रस्त्याच्या कडेला जमा होऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘शेतकऱ्यांना कृषी वीज पुरवठा नियमित ८ तास झालाच पाहिजे’, ‘नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी,’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. थोड्याच वेळाने हे २० कार्यकर्ते रस्त्यावर आले व चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी अवघ्या चार मिनिटांत त्यांना रस्त्यावरून हटविले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला व आंदोलन अवघ्या अर्ध्या तासात संपविले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी केले. यावेळी चंद्रशेखर साळुंके, प्रकाश बोरसे, यादव रोडगे, दुर्गेश राठोड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन केले.
चौकट
कॅप्शन
कृषी कायद्याच्या विरोधात शरणापूर टी पॉइंट येथे चक्काजाम आंदोलन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.