खासगीत मात्र देतात ‘स्वबळाचा नारा’
By Admin | Updated: June 20, 2014 01:17 IST2014-06-20T01:08:59+5:302014-06-20T01:17:57+5:30
औरंगाबाद : ठीक आहे, त्यांना शक्ती अजमावयाची असेल तर एकदा होऊन जाऊद्या, असे आव्हान देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते खासगीत बोलताना ‘स्वबळाचा शड्डू’ ठोकतात.

खासगीत मात्र देतात ‘स्वबळाचा नारा’
औरंगाबाद : ठीक आहे, त्यांना शक्ती अजमावयाची असेल तर एकदा होऊन जाऊद्या, असे आव्हान देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते खासगीत बोलताना ‘स्वबळाचा शड्डू’ ठोकतात; परंतु प्रत्यक्ष उघड बोलताना पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हास मान्य असल्याचे सांगत आमच्याच पक्षाची ताकद मोठी असल्याचा दावा मात्र न चुकता करीत आहेत.
जागा वाढवून मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी सुरू केलेल्या दबाब तंत्रावर दोन्ही काँग्रेसचे स्थानिक पुढारी व कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रिया नोंदवीत आहेत. खासगीत बोलताना हे कार्यकर्ते व नेते स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची धुळधाण उडाली; परंतु काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला दोन जागा जास्त मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचा जोर वधारल्याचे त्यांच्या कृतीतून दिसते आहे, तर दबाव तंत्राचे त्यांचे नाटक नेहमीचेच आहे. त्यांना अधिक भाव देऊ नये, असे सांगतानाच स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीला त्यांची जागा दिसेल, असे मत काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते व्यक्त करतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे म्हणतात की, लोकसभा निवडणुकीनंतर तरी काँग्रेसने आता भानावर येणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांनी अर्ध्या-अर्ध्या जागांवर लढले पाहिजे. शेवटी पक्ष संघटना म्हणून राष्ट्रवादीच बळकट आहे, तर शहराध्यक्ष मुश्ताक अहमद त्यापुढेही जाऊन सांगतात की, आम्हाला आता प्रत्येक मतदारसंघातून काम करण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघातून पक्षाचा संभाव्य उमेदवार कोण असावा, याची चाचपणी आम्ही करीत आहोत. आम्ही सातत्याने जनतेच्या संपर्कात आहोत. जनतेची कामे करीत आहोत. पक्षनेत्यांनी आदेश दिल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत.
काँग्रेसचे किरण पाटील म्हणतात की, काँग्रेस नेत्याची प्रतिमा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तुलनेत चांगली आहे. काँग्रेस नेतृत्व संयमी असून बेलगाम नाही.
लोकसभेत फटका बेलगाम प्रवृत्तीचा बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया म्हणाले की, पक्षश्रेष्ठी आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही काम करू.
राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे डॉ. जितेंद्र देहाडे यांचे मत असे की, राष्ट्रवादीचा हा फॉर्म्युला जुनाच आहे. ते अगोदर दबाब वाढवीत नेतात, नंतर सरेंडर होतात.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम सावध प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शहरात आमचीच ताकद अधिक आहे; परंतु निर्णय राज्याच्या नेतृत्वाने घ्यायचा आहे. आम्ही तिन्ही मतदारसंघांतून लढू शकतो; परंतु यातून विरोधकांचा फायदा होऊ शकतो. हे होऊ नये, असे वाटते; परंतु नाइलाज झालाच तर कठोर निर्णय घ्यावाही लागेल.
काँग्रेसने मोठेपणा दाखवावा
मध्यम मार्ग सुचविताना सुधाकर सोनवणे सांगतात की, लोकसभेत काही मतदारसंघांतून आमच्याकडे उमेदवार नव्हता. मग आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. तसाच मोठेपणा काँग्रेसने दाखवावा. जेथे त्यांचे उमेदवार सतत पराभूत होतात, त्या जागा त्यांनी राष्ट्रवादीला द्यायला काय हरकत आहे.