भाजपच्या कार्यक्रमाने सुजविले डोळे
By Admin | Updated: June 14, 2016 00:12 IST2016-06-14T00:05:58+5:302016-06-14T00:12:09+5:30
औरंगाबाद : भाजपने रविवारी झाल्टा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील हॅलोजन बल्बमधील गॅस लिक होऊन हवेत संसर्ग निर्माण झाल्यामुळे नेत्यांसह

भाजपच्या कार्यक्रमाने सुजविले डोळे
औरंगाबाद : भाजपने रविवारी झाल्टा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील हॅलोजन बल्बमधील गॅस लिक होऊन हवेत संसर्ग निर्माण झाल्यामुळे नेत्यांसह अनेक ग्रामस्थांच्या डोळ्याला संसर्ग झाला.
रविवारी रात्री भाजपतर्फे जलयुक्त शिवार योजनेतील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी छोटेखानी सभादेखील झाली. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब व शहरातील काही उद्योजकांची व स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कार्यक्रमस्थळी मोठ्या व्होल्टचे हॅलोजन बल्ब लावण्यात आले होते. त्याच्या प्रकाशामुळे किंवा बल्बमधील गॅस गळती झाल्याने डोळ्यांना त्रास झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी सांगितले, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाल्टा येथे कार्यक्रम सुरू होता. तेथे मोठे हॅलोजन बल्ब लावण्यात आले होते. त्यामुळे कदाचित त्रास झाला असेल. मला काही त्रास झाला नाही; परंतु काही ग्रामस्थांसह संयोजकांना आणि प्रमुख पाहुण्यांनाही डोळ्यांचा त्रास झाल्याचे कानावर आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुठलाही विपरीत प्रकार यामागे नसल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले. आ. बंब यांच्या डोळ्यांना सूज आली असून त्यांनी स्वत: तपासणी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्योजक राम भोगले यांनादेखील डोळ्यांना त्रास झाला.
गॅस गळतीने हा प्रकार घडल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. टी. चव्हाण यांनी सांगितले.