ग्रा.पं. शिपायाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:08 IST2017-09-04T00:08:42+5:302017-09-04T00:08:42+5:30
केळगाव येथील ग्रामपंचायतीचे शिपाई विठ्ठल पांडू वाघ यांचा संशयास्पद मृत्यू झाला

ग्रा.पं. शिपायाचा संशयास्पद मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : तालुक्यातील केळगाव येथील ग्रामपंचायतीचे शिपाई विठ्ठल पांडू वाघ यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी संगनमत करून बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
जोपर्यंत या सर्वांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताचा मुलगा, मुलगी, पत्नी व नातेवाईकांनी घेतल्याने रविवारी येथे तणाव निर्माण झाला होता.
आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, असे म्हणत त्यांनी सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही वेळ मृतदेह ठेवून ठिय्या मांडला होता.
पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याने वाघ यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. चौकशी सुरु आहे. आम्हाला आमचे काम करू द्या, असे म्हणत प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली.
मयताची पत्नी व मुलीचा म्हणण्यानुसार, विठ्ठल वाघ यांचे काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच व इतर लोकांशी वाद झाला होता. हा वाद आपण गावकºयांसमोर बसून मिटवून घेऊ असे म्हणत सरपंच सोमीनाथ नारायण कोल्हे, उपसरपंच संतोष दगडू जाधव, पोलीस पाटील बाळू हरी इवरे, संदीप सर्जेराव पवार, गजानन मुळे, किशोर शिंदे, आदींनी ग्रामपंचायतीत बोलावून वाद मिटविण्याऐवजी वाघ यांना जातीवाचक शिविगाळ केली. यामुळे आम्ही १ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने या सर्व लोकांनी संगनमत करुन शनिवारी वाघ यांना तुम्हाला पार्टी देतो, असे म्हणून बाहेर घेऊन गेले व त्यांना मारहाण करुन खून करून त्यांचे प्रेत भल्या पहाटे घरी आणून टाकले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन साबळे, सीताराम कांबळे, प्रा. अनिल साबळे, सतीश शेलार, सखाराम आहिरे, अशोक कांबळे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी सिल्लोड ग्रामीणचे सपोनि. पाटील यांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर खून व इतर गुन्हे दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाही, असे सांगितले. पोलिस ठाणे परिसरात मोठ्या संख्येने समाजाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.