उमरी लाच प्रकरणातील महिला अधिकाऱ्याचे निलंबन लांबणीवर
By Admin | Updated: August 20, 2014 00:17 IST2014-08-19T23:52:16+5:302014-08-20T00:17:31+5:30
बी.व्ही. चव्हाण, उमरी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबनाची कारवाई लांबणीवर टाकण्यात आल्याबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़

उमरी लाच प्रकरणातील महिला अधिकाऱ्याचे निलंबन लांबणीवर
बी.व्ही. चव्हाण, उमरी
येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शांता सुरेवाड यांना ३० हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली असताना त्या कामावर परत आल्या़ त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई लांबणीवर टाकण्यात आल्याबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
एखाद्या लोकसेवकाला लाच घेताना पकडल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई लगेच करण्यात येते़ यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या प्रवृत्तीवर आळा बसण्यासाठी हा एक पहिला व महत्त्वाचा उपाय आहे़ यामुळे जनतेत व लोकसेवकात चांगला संदेश जाण्यास मदत होते़
बळेगाव ता़उमरी येथील मदतनीस कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली़ उमेदवाराला नियुक्तीचे आदेश देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकारी शांता अमृतराव सुरेवाड यांना रंगेहाथ पकडले होते़ ७ आॅगस्ट रोजी भावसार चौक हनुमान अपार्टमेंट, नांदेड येथे एसीबीचे उपअधीक्षक एम़जी़ पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली़ जामीनावर सुरेवाड यांची सुटका झाली़ त्यामुळे पुन्हा त्या कामावर आल्या़ उमरी ३ अंगणवाडी सेविका, ८ मिनी अंगणवाडी सेविका व १४ मदतनीस अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया झाली़ या प्रक्रियेच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत. मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष करून भरतीप्रक्रिया आटोपण्यात आली़
विशेष म्हणजे कार्यालयातील शिक्के, आदेशाच्या प्रती, निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे रजिस्टर व कागदपत्रे हा दस्तावेज अधिकाऱ्यांनी घरी नेला़ घरातूनच सर्व भरती प्रक्रिया बेदरकारपणे चालू होती़ या गैरप्रकाराबद्दल उमरी तालुक्यातील अनेक उमेदवार व नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़
काही घडलेच नाही अशा अविर्भावात संबंधित लाचखोर अधिकारी कामावर आल्या़ एसीबीने त्याच दिवशी सदर कारवाईची माहिती जिल्हा परिषदेला दिली़ मात्र अद्याप त्यावर कसलीच कारवाई झाली नाही़ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्यांंवर लगेच निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद आहे़ येथे ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई झाली असताना अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत़
उमरीत तहसीलदार उदयकुमार शहाणे, पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, पोलिस जमादार भानुदास वैद्य यानंतर आता बालविकास प्रकल्प अधिकारी शांता सुरेवाड अशी सरकारी सेवकांची शृंखला एसीबीच्या जाळ्यात अडकली़ यावरून अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जनतेची लुट होत असल्याचे सिद्ध झाले़ यातील पोलिस खात्यातील दोघांचे लगेच निलंबन झाले़ मात्र इतर खात्यातील कर्मचाऱ्यांचे का होत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे़