अब्दुल सत्तार यांना यादी देणाऱ्या तहसीलदाराचे झाले निलंबन
By Admin | Updated: June 23, 2017 01:04 IST2017-06-23T01:00:39+5:302017-06-23T01:04:51+5:30
औरंगाबाद : संजय गांधी निराधार योजनेच्या २२४९ लाभार्र्थींना अनुदान मंजूर झालेले नसतानाही मंजूर म्हणून तशी यादी सही करून तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांना दिली.

अब्दुल सत्तार यांना यादी देणाऱ्या तहसीलदाराचे झाले निलंबन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संजय गांधी निराधार योजनेच्या २२४९ लाभार्र्थींना अनुदान मंजूर झालेले नसतानाही मंजूर म्हणून तशी यादी सही करून तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांना दिली. निवडणुकीदरम्यान सत्तार यांनी संबंधित लाभार्र्थींना अभिनंदन पत्र देऊन ‘मी तुमची पगार सुरू केली. त्वरित बँकेत खाते उघडावे, असे कळवले होते. प्रत्यक्षात या लाभार्र्थींना आतापर्यंत पगार सुरू झाली नाही. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन केलेल्या चौकशीत दोषी आढळल्यानंतर तत्कालीन तहसीलदार राहुल गायकवाड यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काल निलंबित केले.
१२ एप्रिल २०१७ रोजी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राहुल गायकवाड यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. गायकवाड यांनी २ हजार २४९ अपात्र लाभार्थींना पात्र ठरवून प्रशासनाची व लाभार्थींची फसवणूक केली असल्याचे प्राथमिक चौकशीवरून सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नमूद केले होते. गायकवाड यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत गायकवाड यांचे मुख्यालय जालना जिल्हाधिकारी कार्यालय हे राहील.
याप्रकरणी सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे व इद्रीस मुल्तानी यांनी महसूलमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून चौकशी केली असता २२४९ लाभार्थींच्या संचिका नामंजूर करण्यात आल्या होत्या.
नामंजूर असतानाही अब्दुल सत्तार यांना ही यादी मंजूर म्हणून स्वाक्षरी करून दिली होती. त्यावरून सत्तार यांनी लाभार्थींना अभिनंदन पत्रे पाठवली; परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत या लाभार्थींना अनुदान मिळाले नाही, असे इद्रिस मुल्तानी यांनी सांगितले.