निलंबन शिक्षेसाठी नसून त्यामुळे कलंकही लागत नाही...
By Admin | Updated: July 21, 2015 00:19 IST2015-07-21T00:19:12+5:302015-07-21T00:19:12+5:30
औरंगाबाद : निलंबन हे शिक्षेसाठी नसून त्यामुळे कुठलाही कलंक लागत नाही. तर निलंबन हे चौकशी करण्यासाठी केलेले असल्याचे सांगत

निलंबन शिक्षेसाठी नसून त्यामुळे कलंकही लागत नाही...
औरंगाबाद : निलंबन हे शिक्षेसाठी नसून त्यामुळे कुठलाही कलंक लागत नाही. तर निलंबन हे चौकशी करण्यासाठी केलेले असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी निलंबनाविरुद्ध चार शिक्षकांनी दाखल केलेल्या चार स्वतंत्र याचिका फेटाळून लावल्या.
सहायक शिक्षिका शमा फिरदौस मोहम्मद हाजी, शिक्षक मोहम्मद अझर मोहम्मद अकबर, खान इम्रान खान उमर आणि गाझी मुदस्सीर अहमद नुरुल्ला हे जसवंतपुऱ्यातील राजधानी उर्दू स्कूलमधील शिक्षक आहेत. विविध बेकायदेशीर कारवाया केल्याप्रकरणी या चौघांना गुलशन शिक्षण प्रसारक मंडळाने निलंबित केले होते. हे निलंबन बेकायदा असून, रद्द करण्यात यावे, अशी मागणी करीत या चारही शिक्षकांनी स्वतंत्र याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या.
या चारही याचिकांची एकत्रित सुनावणी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठासमोर झाली. या निलंबनाच्या आदेशात निलंबनाचा कालावधी नमूद नाही, तसेच चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती ही कायदेशीररीत्या गठीत केली नसल्याचे याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयात मांडण्यात आले. मात्र, हे निलंबन चार महिन्यांसाठी असून, चौकशी करण्यासाठी समिती नियमाप्रमाणे नियुक्त करण्यात आल्याचे प्रतिवादींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून उपरोक्त मत नोंदवत खंडपीठाने चारही याचिका फेटाळून लावल्या.
गुलशन शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अॅड. अली झिशान व राजधानी उर्दू स्कूलतर्फे अॅड. प्रशांत नागरगोजे यांनी बाजू मांडली.