निलंबन मागे घेऊन दिली 'क्रीम पोस्ट' !
By Admin | Updated: July 7, 2014 00:10 IST2014-07-06T23:14:55+5:302014-07-07T00:10:04+5:30
बीड : निलंबनाची कारवाई केलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला आठ दिवसातच पुनर्निर्युक्ती दिली़

निलंबन मागे घेऊन दिली 'क्रीम पोस्ट' !
बीड : निलंबनाची कारवाई केलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला आठ दिवसातच पुनर्निर्युक्ती दिली़ एवढेच नाही तर त्यांना माजलगाव गटशिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी चार्ज देऊन ‘क्रीम पोस्ट’ही बहाल केली़ सीईओ मेहेरबान झाले तर काय चमत्कार होऊ शकतो हे यानिमित्ताने उघड झाले़
माजलगाव येथील गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची भूम येथे बदली झाली़ त्यानंतर जागा रिक्त झाली़ ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी़ ए़ कावळे यांना गटशिक्षधाधिकारीपदाचा पदभार देण्यात आला़
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी अंधारे यांनी चार्ज सोडण्यापूर्वी कावळे यांच्याविरोधात सीईओ राजीव जवळेकर यांच्याकडे चौकशी अहवाल दिला होता़ त्यात म्हटले होते की, शिक्षण विस्तार अधिकारी कावळे यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता शिक्षकांची परस्पर व्यवस्था केली, वरिष्ठांचे आदेश पाळले नाहीत, कामात कुचराई केली असा ठपका ठेवला़ त्यानंतर २४ जून २०१४ रोजी सीईओ जवळेकर यांनी कावळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली़ त्यानंतर २ जुलै २०१४ रोजी जवळेकर यांच्याच आदेशाने कावळे यांचे निलंबन रद्द करुन त्यांना पुन्हा पदस्थापना देण्यात आली़ पदस्थापना देताना त्यांना माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच नेमणूक दिली़ महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून चार्ज स्वीकारला़ नियमानुसार, ज्या ठिकाणाहून निलंबनाची कारवाई झाली तेथे पुन्हा पदस्थापना देता येत नाही; परंतु कावळेंसाठी हा नियम शिथिल करण्यात आला़ त्यामुळे कावळे यांच्यावरील कारवाई फुसका बार ठरली आहे़
याबाबत सीईओ राजीव जवळेकर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. (प्रतिनिधी)
आदेशही परस्पर?
सूत्रांच्या माहितीनुसार कावळे यांचे निलंबन रद्द करुन त्यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश परस्पर निघाले़ त्याची संचिका रीतसर शिक्षण विभागातून सीईओंकडे जाणे अपेक्षित होते़ उल्लेखनीय हे की, विभागीय चौकशी व दोषारोपपत्र या प्रक्रि येलाही बगल देत हे आदेश खुद्द सीईओंच्याच स्वाक्षरीने निघाले आहेत़
वैराळेंचेही निलंबन
घेतले मागे
माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील गौतम वैराळे या शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली होती. मात्र तीन आठवड्याच्या आत त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. तत्कालिन गट शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनीच वैराळे यांचा अहवाल पाठवला होता. मात्र निलंबन मागे घेतल्याने 'मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर' असाच काहीसा प्रकार झाला आहे.