चार शिक्षकांवर निलंबनाची संक्रात
By Admin | Updated: January 13, 2017 00:39 IST2017-01-13T00:37:57+5:302017-01-13T00:39:18+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबाद : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेदरम्यान कळंब येथील परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून केंद्र चालकाचा निषेध करणे बाळकृष्ण तांबारे यांच्या अंगाशी आले आहे.

चार शिक्षकांवर निलंबनाची संक्रात
उस्मानाबाद : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेदरम्यान कळंब येथील परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून केंद्र चालकाचा निषेध करणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांच्याविरूद्ध जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. याबरोबरच आंतरजिल्हा बदलीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात बेकायदेशीररित्या आंदोलन केल्याचा ठपका ठेवित तीन गुरूजींचे ‘सस्पेन्शन’ केले आहे. या कारवाईमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ८ जानेवारी रोजी झाली. कळंब तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी तीन केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. यापैैकी एका परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्णा तांबारे यांच्यासह काही गुरूजींनी ‘ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षकांना पर्यवेक्षणाची जबाबदारी दिली जात नाही’, असा आरोप करीत केंद्राच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडला. या प्रकरणी नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशावरून सीईओ आनंद रायते यांनी तांबारे यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात आंतरजिल्हा बदलीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर बेकायदेशीररित्या आंदोलन केल्याचा ठपका ठेवित आनाळा जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक संतोष नारायण कापसे यांच्यासह अन्य दोघांविरूद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. संबंधित शिक्षकांच्या विनंतीनुसार उस्मानाबाद जि.प.ने सोलापूर जिल्हा परिषदेकडे त्यांचे संमतीपत्र सादर केले असतानाही आंदोलन करून प्रशासकीय कामात अडथळा आणला, असे संबंधित गुरूजींच्या निलंबन आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अन्य दोन शिक्षकांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.(प्रतिनिधी)