निलंबन रद्दचे बोगस आदेश
By Admin | Updated: July 18, 2014 01:46 IST2014-07-18T00:23:52+5:302014-07-18T01:46:40+5:30
संजय तिपाले , बीड नियमबाह्य पदोन्नत्या, बदल्यांमुळे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेत आता तर चक्क निलंबन रद्दचे आदेशही 'बोगस' निघू लागले आहेत़

निलंबन रद्दचे बोगस आदेश
संजय तिपाले , बीड
नियमबाह्य पदोन्नत्या, बदल्यांमुळे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेत आता तर चक्क निलंबन रद्दचे आदेशही 'बोगस' निघू लागले आहेत़ एका मुख्याध्यापिकेच्या निलंबन रद्द प्रकरणी काढण्यात आलेल्या आदेशातून हे उघड झाले आहे़ एकाच तारखेत निघालेल्या या आदेशाने शिक्षण विभागाने केलेली 'शाळा' चव्हाट्यावर आली आहे़
बीड शहरातील श्री चक्रधर शिक्षण व समाज प्रबोधन मंडळ या संस्थेच्या शिवनेरी प्राथमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या ए़ आऱ गजरे यांच्या निलंबनासाठी संस्थेने शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार तत्कालिन शिक्षणाधिकारी (प्रा.) भास्कर देवगुडे यांनी निलंबनास परवानगी दिली होती. या परवानगीच्या आधारावर १९ मे २०१४ रोजी गजरे यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून एस. वाय. डोईफोडे यांना मान्यता देण्यात आली. गजरे यांच्यावर संस्थेने कार्यालयीन कामकाजात नियमबाह्यता व आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता़
दरम्यान, निलंबनाची कारवाई झाल्यानंतर मुख्याध्यापिका गजरे यांनी शिक्षणाधिकारी (प्रा.) देवगुडे यांना लेखी पत्र देऊन आक्षेप नोंदविला. त्यानंतर २७ जून रोजी देवगुडे यांच्या स्वाक्षरीने दोन आदेश निघाले. त्यानुसार ए. आर. गजरे यांच्यावर संस्थेने केलेली कारवाई नियमबाह्य असल्याने ते रद्द करण्यात येत असल्याचे नमूद आहे. त्यापैकी एका आदेशाचा जावक क्र. ५८५९ आहे तर दुसऱ्या आदेशाचा जावक क्र. ६०७९ असा आहे. एकाच दिवसात निलंबन रद्दचे दोन आदेश निघालेच कसे ? याचे कोडे कायम आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे एकाच दिवसात २२० पत्रे शिक्षण विभागातून कोणाला गेली याचे गौडबंगाल कायम आहे़
अन् साक्षात्कार झाला!
शिक्षण विभागाने १९ मे २०१४ रोजी एका आदेशाद्वारे शिवनेरी प्रा. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ए. आर. गजरे यांच्या निलंबनास परवानगी दिली. मात्र, त्यानंतर गजरे यांनी आक्षेप नोंदविल्यावर शिक्षण विभागाला साक्षात्कार झाला आणि २७ जून २०१४ रोजी गजरे यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश संस्था सचिवाला लेखी पत्राद्वारे दिले. विशेष म्हणजे दोन्ही आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्रा.) भास्कर देवगुडे यांच्याच स्वाक्षरीने निघाले. गजरे यांच्यावरील निलंबनाची कारवाई एकतर्फी होती.
निलंबनापूर्वी त्यांची चौकशी केली गेली नाही ही चूक लक्षात आल्याने निलंबन रद्दची उपरती झाली, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत देवगुडे यांच्याशी संपर्क झाला नाही.
२७ तारखेच्या आदेशात २८ तारखेचा संदर्भ
६०७९ असा जावक क्रमांक असलेल्या पत्रावर पाच संदर्भ दिले असून त्यापैकी पाचव्या क्रमांकाचा संदर्भ संस्थेने २८ जून २०१४ रोजी दिलेल्या पत्राचा आहे. २७ तारखेच्या आदेशात २८ तारखेच्या पत्राचा संदर्भ कसा काय असू शकतो? त्यामुळे हा आदेश बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षणाधिकारी म्हणाले, चौकशी सुरु
याबाबत प्रभारी शिक्षणाधिकारी एस. वाय. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, एकाच दिवशी मुख्याध्यापिकेच्या निलंबन रद्दचे दोन आदेश गेले असल्याचे माझ्याही कानावर आले आहे. याची मी चौकशी सुरु केली आहे. आदेश कोणी दिले? याची खातरजमा करुन कारवाई करावी लागेल.