दोन दुय्यम निबंधक निलंबित
By Admin | Updated: November 30, 2014 01:01 IST2014-11-30T00:24:34+5:302014-11-30T01:01:12+5:30
सुनील कच्छवे : औरंगाबाद शासकीय दरापेक्षा कमी दरात रजिस्ट्री करून देण्याच्या घोटाळ्यात नोंदणी महानिरीक्षकांनी औरंगाबादेतील दोन दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

दोन दुय्यम निबंधक निलंबित
सुनील कच्छवे : औरंगाबाद
शासकीय दरापेक्षा कमी दरात रजिस्ट्री करून देण्याच्या घोटाळ्यात नोंदणी महानिरीक्षकांनी औरंगाबादेतील दोन दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
याशिवाय इतर तिघांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कुंभेफळ येथील व्यवहारांच्या चौकशी अहवालावर ही कारवाई करण्यात आली आहे. नवनगरातील इतर आठ गावांतही अशाच प्रकारचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावर कारवाई होणे अद्याप बाकी आहे.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या दुय्यम निबंधकांची नावे सतीश कुलकर्णी आणि शेरकर अशी आहेत, तर साकलावर, शेख आणि ठाकरे या तिघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रजिस्ट्री घोटाळ्यात हे पाचही जण दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस नोंदणी उपमहानिरीक्षक बी.एम. कांबळे यांनी केली होती.
खातेनिहाय चौकशीचे आदेश दिलेल्यांपैकी शेख आणि ठाकरे हे दोघे काही महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत, तर साकलवार यांची बदली झाली असून, ते सध्या पुणे येथे कार्यरत आहेत. राज्य शासनाने चालू वर्षी १ जानेवारीपासून जमिनींचे नवीन शासकीय (रेडिरेकनर) दर लागू केले आहेत.
त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा एमआयडीसीलगतच्या नऊ (नवनगर) गावांतील जमिनींच्या शासकीय दरात अनेक पटींनी वाढ करण्यात आली आहे; पण तरीही काही बिल्डर आणि दलालांनी रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून जुन्याच दराने रजिस्ट्रीचे व्यवहार नोंदणी करण्याचा उद्योग चालविला होता.
याविषयी कुणकुण लागल्यानंतर नोंदणी उपमहानिरीक्षक बी.एम. कांबळे यांनी आॅगस्ट महिन्यात सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी वाय.डी. डामसे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डामसे यांनी सुरुवातीला नवनगरातील कुंभेफळ गावातील व्यवहारांची तपासणी केली. तेव्हा या गावातील जुलैपर्यंत असंख्य व्यवहार जुन्याच दराने नोंदवून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्याचे आढळून आले.
त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. त्यानंतर उर्वरित आठ गावांतील व्यवहारांचीही तपासणी करण्यात आली. नोंदणी महानिरीक्षकांनी शुक्रवारी कुंभेफळ येथील व्यवहारांच्या तपासणी अहवालावरून कारवाईचे आदेश जारी केले. त्यात शेरकर आणि सतीश कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आले असून शेख, ठाकरे आणि साकलावार यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे नोंदणी उपमहानिरीक्षक बी.एम. कांबळे यांनी सांगितले.