निलंबित ग्रामसेवकास 'क्लीन चीट'
By Admin | Updated: September 7, 2014 00:25 IST2014-09-06T23:35:08+5:302014-09-07T00:25:23+5:30
बीड : बदलीच्या ठिकाणी रूजू न झालेल्या ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश सीईओ राजीव जवळेकर यांनी दिले होते़ परंतु पंचायत विभागाने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या अटीवर संबंधित ग्रामसेवकाला

निलंबित ग्रामसेवकास 'क्लीन चीट'
बीड : बदलीच्या ठिकाणी रूजू न झालेल्या ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश सीईओ राजीव जवळेकर यांनी दिले होते़ परंतु पंचायत विभागाने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या अटीवर संबंधित ग्रामसेवकाला आदेश बजावलेच नाहीत़ पंचायत विभागातील कागदी घोड्यांचा आणखी एक नमुना पुढे आला आहे़
त्याचे झाले असे, केज पंचायत समिती अंतर्गत मे २०१४ मध्ये बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली होती़ यावेळी सोनीजवळा येथील ग्रामसेवक राम चवरे यांची प्रशासकीय कारणावरून जोला सासूरा ग्रामपंचायतीमध्ये बदली झाली होती़ परंतु चवरे काही सोनीजवळा येथील पदभार सोडण्यास तयार नव्हते़ त्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी नोटिसाही बजावल्या़ परंतु या नोटिसांनाही त्यांनी दाद दिली नाही़ त्यामुळे गट विकास अधिकारी यांनी त्यांचा अहवाल सीईओ राजीव जवळेकर यांना पाठविला़ १ सप्टेंबर २०१४ रोजी जवळेकर यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू न होणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, हलगर्जीपणा करणे असा ठपका ठेवत गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून ग्रामसेवक चवरे यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश काढले़ सीईओंनी बजावलेले आदेश पंचायत विभागाने बजावले नाहीत़ आदेश पंचायतमध्येच रोखल्याने आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही़
पंचायतचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी म्हणाले, चवरे यांनी आदेशाचे पालन केले़ ज्यामुळे निलंबनाचे आदेश निघाले ती दुरूस्ती झाल्याने आदेश बजावले नाहीत़
सीईओ जवळेकर म्हणाले, आदेश न बजावल्याप्रकरणी खुलासा मागविण्यात येईल़ (प्रतिनिधी)
निलंबनाचे आदेश निघताच ग्रामसेवक चवरे ताळ्यावर आले़ त्यांनी सोनीजवळा येथील पदभार तर सोडलाच शिवाय जोला सासूरा येथे पदस्थापनेच्या ठिकाणी रुजूही झाले़ ते बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्यामुळे पंचायत विभागाने त्यांना क्लीन चीट देऊन टाकली़