मुंबईची सशस्त्र टोळी अटकेत
By Admin | Updated: July 13, 2014 00:46 IST2014-07-13T00:44:45+5:302014-07-13T00:46:10+5:30
औरंगाबाद : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून एका भंगारवाल्या व्यापाऱ्याचा ‘गेम’ करण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या चार गुन्हेगारांना गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी रात्री शिताफीने अटक केली.

मुंबईची सशस्त्र टोळी अटकेत
औरंगाबाद : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका भंगारवाल्या व्यापाऱ्याचा ‘गेम’ करण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या चार गुन्हेगारांना गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी रात्री साजापूरजवळ शिताफीने अटक केली. आरोपींच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, तलवार व कुकरी, असा शस्त्रसाठा व एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नईमोद्दीन जैनाद्दीन खान (५३), रिझवान नईमोद्दीन खान (२०), नौशाद नईमोद्दीन खान (२६, रा. दिलेरगंज काला कुंडा, प्रतापगढ, उत्तर प्रदेश) व खुर्शीद आलम अब्दुल हमीद (२६, रा. मिंडारा, आनापूर, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून हे सर्व आरोपी मुंबईतील धारावी भागात राहतात.
कारवाईबाबत गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अविनाश आघाव यांनी सांगितले की, साजापूर ते मुंबई हायवे रोडवर एका इनोव्हा कारमध्ये कही जण शस्त्र घेऊन काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
सशस्त्र गुन्हेगार फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने साजापूर गाठले. तेथे खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाची कार नजरेस पडली. पोलिसांनी शिताफीने कार अडविली. पोलिसांना पाहताच आरोपींनी कार सोडून धूम ठोकली. तेव्हा पाठलाग करून त्यातील वरील चार आरोपींना पोलिसांनी पकडले. एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला.
पकडलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, कुकरी, तलवार, असा शस्त्रसाठा आढळून आला. त्यावरून पोलिसांनी या आरोपींना अटक केली.
चाळीस लाखांचा वाद
अटक करण्यात आलेले आरोपी हे धारावीत भंगारचा व्यवसाय करतात. औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका भंगार व्यापाऱ्यासोबत या आरोपींचा ४० लाखांच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता.
पैसे मिळत नसल्याने हे आरोपी काल तयारीनिशी औरंगाबादेत आले होते, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अविनाश आघाव यांनी सांगितले. या आरोपींचा एक साथीदार फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे आघाव म्हणाले.