करणी केल्याचा संशय; पत्नीची हत्या
By Admin | Updated: July 4, 2014 00:19 IST2014-07-03T23:55:09+5:302014-07-04T00:19:35+5:30
मुखेड : करणी केल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शिकारा ता. मुखेड येथे २ जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

करणी केल्याचा संशय; पत्नीची हत्या
मुखेड : करणी केल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शिकारा ता. मुखेड येथे २ जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
सावळी ता. बिलोली येथील सुनीता नागनाथ कंदमवाड हिचा विवाह शिकारा ता. मुखेड येथील रामदास लक्ष्मण आचेवाडसोबत १० वर्षांपूर्वी झाला होता. याकाळात त्यांना दुर्गा(वय ६), प्रल्हाद(वय ८) ही दोन अपत्येही झाली. रामदास यांना गेल्या अनेक दिवसापासून पोटाचा विकार आहे. त्याला पत्नीवर संशय होता. पत्नीने करणी केल्यानेच विकार झाल्याचा संशय रामदास यांच्या मनात घर करुन गेला. याच कारणावरुन पत्नीशी वाद घालून तो तिला मारहाणही करायचा. पती आपल्यावर विनाकारण संशय घेवून मारहाण करीत असल्याने सुनीताने ही बाब माहेरी सांगितली. समाजातील काही लोकांनी याबाबत मध्यस्ती करुन रामदासची समजूत काढली, चांगल्या रुग्णालयात जावून उपचार करण्याचा सल्लाही दिला.
याच कारणावरुन २ जुलैच्या रात्री दोघा पती-पत्नीत वाद झाला. रामदासने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर, पोटावर, पायावर कत्तीने वार केले. यावेळी ‘बाबा, आईला मारु नका,’ म्हणून दोन्हीही लेकरांनी टाहो फोडला. मात्र पत्नी बेशुद्ध होईपर्यंत तिला रामदास मारहाणच करीत राहिला. या घटनेची स्वत:हून माहिती पोलिस ठाण्यात जावून दिली. गंभीर जखमी सुनीता यांना गावकऱ्यांनी मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, पुढे नांदेड येथे हलविण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यात असतानाच सुनीताने दम सोडला.
मयताच्या भाऊ राजू कंदमवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती रामदासविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. देगलूरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी तपास करीत आहेत.(वार्ताहर)