‘जोडी हजार रुपये’चा सूर्यवंशी देत होता मंत्र

By Admin | Updated: May 17, 2016 00:35 IST2016-05-17T00:18:59+5:302016-05-17T00:35:16+5:30

औरंगाबाद : जीवनात पैसा कसा कमवायचा, करोडपती कसे व्हायचे, याचा मंत्रच ‘ट्रू लाईफ’ कंपनीचा सर्वेसर्वा दीपक सूर्यवंशी रविवारी रात्री औरंगाबादेतील गुंतवणूकदारांना देत होता.

The Suryavanshi of 'Jodi thousand rupees' was given to the spell | ‘जोडी हजार रुपये’चा सूर्यवंशी देत होता मंत्र

‘जोडी हजार रुपये’चा सूर्यवंशी देत होता मंत्र

सिंगापूर टूरचेही आमिष : चमत्कारी अंगठी फक्त ८० रुपयांचीच
औरंगाबाद : जीवनात पैसा कसा कमवायचा, करोडपती कसे व्हायचे, याचा मंत्रच ‘ट्रू लाईफ’ कंपनीचा सर्वेसर्वा दीपक सूर्यवंशी रविवारी रात्री औरंगाबादेतील गुंतवणूकदारांना देत होता. तुम्ही देवाचा जप करू नका, जप करा फक्त ‘जोडी हजार’चा. एक जोडी आणून आमच्याकडून हजार रुपये घ्या. ‘जेवढ्या जास्त जोड्या, तेवढा पैसा जास्त’असा मंत्र त्याने दिला. गुंतवणूकदार म्हणून पोलीस येथे बसले आहेत, असा जराही संशय त्याला आला नाही.
साखळी पद्धतीने सभासदांची संख्या वाढवून नाशिकची ‘ट्रू लाईफ’ कंपनी सामान्यांना गंडा घालण्याचा उद्योग करीत असल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे पोहोचल्या होत्या. आर्थिक फसवणुकीच्या घटनेत कंपनीचा म्होरक्या शक्यतो हाती लागत नाही. पैशांच्या जोरावर तो विदेशात लपून बसतो, असा पोलिसांचा अनुभव होता. त्यामुळे ‘ट्रू लाईफ’च्या एजंटांवर कारवाई करण्याऐवजी थेट म्होरक्यालाच ताब्यात घेण्याचे त्यांचे मनसुबे होते. त्यासाठी दीपक सूर्यवंशी औरंगाबादेत येण्याची त्यांना प्रतीक्षा होती.
‘ट्रू लाईफ’च्या वर्धापन दिनानिमित्त सूर्यवंशी औरंगाबादेत येणार असून, तापडिया नाट्यमंदिरमध्ये तो गुंतवणूकदारांचा मेळावा घेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस गुंतवणूकदार म्हणून मेळाव्यात सहभागी झाले होते. शहरातील १८०० पेक्षा जास्त नागरिक यावेळी उपस्थित होते. साखळी पद्धतीने जास्तीत जास्त सभासद मिळवून देणाऱ्याचे सूर्यवंशीच्या हस्ते सत्कारही झाले. स्टेजवर येताच ‘झिंगाट’ सारख्या गाण्यांवर नृत्य करण्याचा आग्रहदेखील तो करीत होता.
असे व्हा करोडपती
करोडपती होणे सोपे असल्याचा दावा करून त्यासाठी काय करावे, याचे धडे चव्हाण देत होता. सभासद म्हणून एक जोडी (दोघे जण) आणल्यास आमच्याकडून रोख हजार रुपये दिले जातात. तुम्ही जेवढे जास्त सभासद आणाल तेवढी कमाई वाढेल. यापुढे देवाचा जप करू नका, ‘जोडी हजार रुपये’ हाच जप करीत जा. तोच तुम्हाला करोडपती बनवेल, असा सल्लाही त्याने दिला.
फ्लॅट अन् सिंगापूर वारी
सिल्व्हर ते क्राऊन क्लब, अशी सभासदांची उतरंड त्याने समजून सांगितली. तुम्ही क्राऊन क्लबमध्ये आल्यास अलिशान फ्लॅट दिला जाईल, तसेच सिंगापूरची टूरही मिळेल, असे आमिषही त्याने दाखविले.
योजनेत निकृष्ट दर्जाच्या वस्तू
सभासद बनलेल्यांना ‘ट्रू लाईफ’कडून एक अंगठी दिली जात असे. चार हजार रुपये किमतीची पंचधातूची ही अंगठी चमत्कारी असल्याचे सांगितले जात होते. ही अंगठी तुमचे जीवन बदलेल, असा दावा सूर्यवंशी करीत होता.
अंगठीप्रमाणेच भाग्यशाली ब्रासलेटही तो देत असे. प्रत्यक्षात या अंगठीचे खरे मूल्य शंभर रुपयांच्या आत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाच प्रकारे सूर्यवंशीकडे गॅस सेफ्टी मशीन, वॉटर प्युरिफायर आदी वस्तूही अत्यंत निकृष्ट दर्जाच्या होत्या.
२६ मेपर्यंत कोठडी
फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या दीपक सूर्यवंशी व इतर सहा आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता २६ मेपर्यंत आरोपींचा मुक्काम कोठडीत असणार आहे.
‘एज्युकेशन पॅकेज’चा मुलामा
कार्यक्रमानंतर सर्व नागरिक आपापल्या घरी परतले. सूर्यवंशी, त्याचे सहकारी निघण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी पोलीस धडकले. त्यांनी आपली खरी ओळख देताच सर्वांचेच धाबे दणाणले.
अंगठी, ब्रासलेटसाठी आपण चार हजार घेत नव्हतो, तर सभासदांना विविध कोर्सचे ‘एज्युकेशन पॅकेज’ही देणार होतो, असा दावा त्याने केला.

Web Title: The Suryavanshi of 'Jodi thousand rupees' was given to the spell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.