नगराध्यक्षपदी सूर्यतळ, उपाध्यक्षपदी खुराणा
By Admin | Updated: July 16, 2014 00:50 IST2014-07-16T00:32:42+5:302014-07-16T00:50:54+5:30
हिंगोली : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता सूर्यतळ यांची तर उपनगराध्यक्षपदी जगजितराज खुराणा यांची मंगळवारी निवड करण्यात आली.

नगराध्यक्षपदी सूर्यतळ, उपाध्यक्षपदी खुराणा
हिंगोली : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता सूर्यतळ यांची तर उपनगराध्यक्षपदी जगजितराज खुराणा यांची मंगळवारी निवड करण्यात आली.
हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी राष्ट्रवादीच्या अनिता सूर्यतळ यांचाच एकमेव अर्ज असल्याने त्यांची मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता नगरपालिकेत झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी जाहीर केले. उपनगराध्यक्षपदासाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य झाले. या पदासाठी माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे व जगजितराज खुराणा या दोघांनी उमेदवारी दाखल केली होती. पक्षाचे निरीक्षक अरविंद चव्हाण व आ. रामराव वडकुते यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहात प्रत्येक नगरसेवकाच्या खाजगी मुलाखती घेतल्या. त्यानंतर या पदासाठी जगजितराज खुराणा यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यामुळे माजी नगराध्यक्ष लुंगे नाराज झाले. त्यांची नाराजी दुर करण्यात माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांना यश आले. त्यानंतर लुंगे यांनी उमेदवारी परत घेतली. नगराध्यक्ष निवडीनंतर पीठासन अधिकारी तडवी यांनी या पदासाठी खुराणा यांचाच एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक बिरजू यादव, अनिल नैैनवाणी, निहाल शेख, सुरेखा शरद जयस्वाल, आमेर अली, एन. एफ. बांगर, अॅड. भुक्तर, आशाताई उबाळे, आरेफ शेख, सुधीर सराफ, खय्युमखॉ पठाण, नगरसेविका अग्रवाल, गणेश बांगर, श्रीराम बांगर, सुभाष बांगर, मनसे जिल्हाध्यक्ष बंडु कुटे, जहिरखॉं पठाण, शरद जयस्वाल, मिलींद उबाळे आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)
पाच नगरसेवक गैैरहजर
उपनगराध्यक्षपदासाठी गणेश लुंगे इच्छुक होते; परंतु त्यांची या पदावर वर्णी लागली नसल्याने ते या निवड प्रक्रियेच्या वेळी गैरहजर होते. या शिवाय नगरसेविका वसंताबाई लुंगे, निर्गुना बोथीकर, शेख शाहिन बेगम व मनसेच्या रेखाताई गोटरे या नगरसेवकांची यावेळी अनुपस्थिती होती.
मुलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य- सूर्यतळ
हिंगोली शहरातील मुलभूत प्रश्न सोडविण्यास आपले प्राधान्य राहिल. शिवाय पालिकेतील सर्व ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेवून विकास कामे करण्यास कटीबद्ध राहणार आहे. शहरातील नागरिकांनीही त्यांच्याकडील कराचा वेळेवर भरणा करून पालिकेला लोकोपयोगी योजना आणण्यासाठी मदत करावी, अशी प्रतिक्रिया नुतन नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ यांनी दिली.
उपाध्यक्षपदावरून नाराजी नाट्य
उपनगराध्यक्षपदासाठी गणेश लुंगे व जगजीत खुराणा यांनी उमेदवारी दाखल केली होती.
पक्ष निरीक्षक चव्हाण व आ. वडकुते यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या मुलाखतीत खुराणा यांच्या बाजूने अनेक नगरसेवकांनी मत नोंदविले. त्यामुळे त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली.
नाराज झालेल्या गणेश लुंगे यांनी प्रक्रियेकडे पाठ फिरविली.