जिल्हाभरात सरीवर सरी
By Admin | Updated: August 31, 2014 01:09 IST2014-08-31T01:06:08+5:302014-08-31T01:09:33+5:30
उस्मानाबाद : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाची सरासरी २४ मि.मी. नोंद झाली असून,

जिल्हाभरात सरीवर सरी
उस्मानाबाद : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाची सरासरी २४ मि.मी. नोंद झाली असून, शनिवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या विविध भागात जोराचा पाऊस झाल्याने विविध प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी दिवसभर अनेक ठिकाणी भिज पाऊस सुरु होता. पहाटेच्या सुमारास उमरगा, लोहाऱ्यासह तुळजापूर व इतर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शनिवारी सकाळपर्यंत उस्मानाबाद तालुक्यात ७.६ मि.मी., तुळजापूर तालुक्यात ५०.७ मि.मी., उमरगा तालुक्यात ५९.८, लोहारा ४२ मि.मी. तर भूम ७.२, कळंब ८.३, परंडा ७.२ आणि वाशी तालुक्यात सरासरी ९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा वार्षिक सरासरी पाऊस ७६७.५ मि.मी. आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३३८ मि.मी. पाऊस झाला असून, आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला आहे. शनिवारी दिवसभर उस्मानाबादेत सूर्यदर्शन झाले नाही. पहाटे सुरु झालेला पाऊस दुपारपर्यंत कायम होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. असेच चित्र जिल्ह्याच्या अन्य भागातही होते. (प्रतिनिधी)
भूम : तालुक्यात पहाटेपासून झालेल्या संततधार पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे.
तालुक्यात १९ आॅगस्टपासून पावसाने चांगली सुरुवात केली असून, त्यात पुन्हा गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वदूर संततधार हजेरी लावली आहे. नांदगाव साठवण तलाव शंभरटक्के भरुन वाहू लागला आहे. हा साठवण तलाव भरल्याने याचा फायदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आरसोली मध्यम प्रकल्पाला होईल. मात्र २८ आॅगस्ट रोजी या मध्यम प्रकल्पात ४९ टक्के पाणीसाठा होता. उर्वरित दोन-तीन दिवस पाऊस चालू राहिल्यास आरसोली मध्यम प्रकल्पही भरेल असा अंदाज सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. तालुक्यात हिवरा, हाडोंग्री, दिंडोरी आदी भागात चांगला पाऊस झाला असून, नदी-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. (वार्ताहर)
कळंब : कळंब शहर व परिसरात शनिवारी दमदार पाऊस झाला. या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस होता. पहाटेपासूनच तालुकाभरात संततधार पावसास सुरवात झाली. दुपारच्या सुमारास पावसाने विसावा घेतला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा रिपरिप सुरु झाली. यामुळे अनेक ठिकाणच्या शेतात पाणी साचले होते. इटकूर, हावरगाव येथील नदीसही दूपारी पाणी आले. दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाची सरासरी ८.३ मी.मी इतकी नोंद झाली आहे. यात ईटकूर सर्कलमध्ये ५ मी.मी, शिराढोण १२ मी.मी., मोहा १५ तर गोविंदपूर सर्कलमध्ये १८ मी.मी पाऊस झाला आहे. (वार्ताहर)
उमरगा : शुक्रवारी झालेल्या पावसाचा जबर तडाखा शहरातील नागरिकांना बसला असून, मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जवाहर, शास्त्रीनगर भागातील ५० घरांना पाण्याने वेढा दिला तर अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. शुक्रवारी रात्री शहर व परिसरात सर्वत्र मोठा पाऊस झाला. उमरगा महसूल विभागात १०८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरात मध्यरात्री पाऊस झाल्याने रस्त्यावरुन पाणी वाहत होते. शहरातील जवाहर, शास्त्रीनगर भागातील राजू हन्नुरे यांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने हन्नुरे कुटुंबियांनी रात्र जागू काढली. या भागातील पंडित ओवांडकर, प्रा. सोमशंकर महाजन यांच्या घराभोवती पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. सलीम हन्नुरे यांच्या घरात पाणी घुसले, गोपीनाथ जाधव, धोंडीबा पांचाळ, राजू लोहार, गुराप्पा माळी, गणेश यादव, अरीफ औटी, प्रसाद पांचाळ, बालाजी घोटाळे, नागदे, राहुल गुरव यांच्या राहत्या घरांना पावसाच्या पाण्याने वेढा दिला आहे. या भागात नव्यानेच सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे. हा भाग मुळातच उतरणीचा असल्याने पूर्वेकडील पावसाचे पाणी या भागातील घराभोवती जमा झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. (वार्ताहर)
शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला. अनेक सर्कलमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सावरगावमध्ये ११६ मि.मी., जळकोट ४६ मि. मी., नळदुर्ग ६७ ईटकळ ५० मि.मी. तर मंगरुळमध्ये ४० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. लोहारा तालुक्यातील माकणी सर्कलमध्ये ८२ मि.मी. तर जेवळीत ३० मि.मी. पाऊस झाला.
गुंजोटी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी व परिसरात दोन दिवस संततधार पाऊस झाल्याने ओढे, नाले भरुन वाहू लागले आहेत. १२ वर्षानंतर पहिल्यांदाच येथील नदी भरुन वाहताना दिसून आली. शनिवारी पहाटे ४ वाजल्यापासून सुरु झाल्याने येथील नदीचे पाणी रस्त्यावरुन वाहू लागली आहे. सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
लोहारा : तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या सर्वदूर पावसाने मध्यरात्रीपासून सास्तूर ते औसा तालुक्यातील गुबाळ रस्त्यावर पाणी वाहत असल्याने अद्यापही रस्ता बंदच आहे. लोहारा व औसा तालुक्याला जोडणारा रस्ता म्हणजे सास्तूर-गुबाळ. शुक्रवारी मध्यरात्रीपासून लोहारा, जेवळी परिसरात रिमझिम पाऊस झाला. यामुळे सदरील ओढ्याचे पाणी रस्त्यावरुन वाहू लागले. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत हा रस्ता बंदच होता. आतापर्यंत पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस झाल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. सर्वाधिक माकणी मंडळार ८२ मि.मी., जेवळी ३० मि.मी. तर लोहारा १४ मि.मी. पाऊस झाला आहे.